ते एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत एकमेकांचे दुष्मन नव्हे

भारतीय संघाने आज पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला तब्बल २०३ धावांनी धूळ चारत १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला. भारतीय संघ ३ फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजेतेपदासाठी लढणार आहे.

असे असले तरी या सामन्यात भारतीय खेळाडू आणि पाकिस्तानचे खेळाडू यांच्यातील अनोख्या मैत्रीचे दर्शन झाले. भारत-पाकिस्तान सामना म्हटलं की दोन्ही देशातील चाहत्यांपासून ते माजी क्रिकेटपटुंपर्यंत सर्वजण याकडे एक वेगळ्याच अर्थाने पाहत असतात.

सामना जो देश जिंकेल त्या देशात फटाके फोडले जातात. मिठाई वाटून आनंद साजरा केला जातो. तसेच सोशल मीडियावर दुसऱ्या देशाला अपशब्दही वापरले जातात.

असे असले तरी आजचा भारत पाकिस्तान सामना अनेक अर्थांनी वेगळा ठरला. आज जेव्हा शुभमन गिलने ५०व्या शेवटच्या चेंडूवर शतक साजरे केले आणि त्यानंतर तो पॅव्हिलिअनमध्ये परत जात होता तेव्हा अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी त्याला थांबवून शुभेच्छा दिल्या. शुभमन शुभेच्छा स्वीकारण्यासाठी तीन-चार वेळा मागे फिरला. त्याला ६ ते ७पाकिस्तानी खेळाडूंनी शतकी खेळीच्या शुभेच्छा दिल्या.

याच सामन्यात भारत जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा ४७.५व्या चेंडूवर शुभमन गिलच्या बुटांची लेस (नाडी) बांधताना पाकिस्तानचा क्षेत्ररक्षक दिसला तर पाकिस्तानच्या फलंदाजीच्या वेळी ७व्या षटकात रोहेल खानच्या बुटाची लेस (नाडी) बांधताना भारतीय खेळाडू दिसला. असे प्रकार हे क्रिकेटमध्ये नवीन नाही परंतु भारत पाकिस्तान सामन्यात त्यातही विश्वचषकात ही गोष्ट तुरळकच.

का बांधतात दुसऱ्या संघातील खेळाडू फलंदाज किंवा यष्टिरक्षकाच्या बुटाची लेस (नाडी)-
फलंदाजी करताना किंवा यष्टिरक्षण करताना खेळाडूने पायात संरक्षण करणारे पॅड घातलेले असतात. त्यामुळे त्याला खाली वाकणे शक्य नसते. त्यामुळे जेव्हा खेळताना बुटाची लेस (नाडी) सुटते तेव्हा एकतर संघातील खेळाडू किंवा प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू ती बांधून देतात.

क्रिकेटमध्ये ही गोष्ट एक सामान्य गोष्ट समजली जाते. बऱ्याच वेळा पंचही खेळाडूंच्या बुटाची लेस (नाडी) बांधून देतात. फलंदाजी करत असलेल्या संघातील खेळाडूंकडे तर दुसऱ्या संघातील खेळाडूंकडून बुटाची लेस (नाडी) बांधून घेण्याशिवाय पर्यायच नसतो.