यु मुंबा आणि तेलुगू टायटन्स यांच्या नावावर असणारा विक्रम बेंगाल वॉरियर्स आणि युपी योध्याने मोडला

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात दररोज नवनवीन विक्रम होत आहेत. प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमातील काही वेगळे विक्रम जे मागील चारही मोसमात अबाधित होते ते या मोसमात लीलया मोडले गेले आहेत. प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमापासून यु मुंबा आणि तेलुगू टायटन्स यांच्या नावावर असणारा एक विक्रम यु पी योद्धा आणि बेंगाल वॉरियर्स संघाने मोडला आहे.

यु मुंबा आणि तेलुगू टायटन्स या संघानी २८ जुलै २०१४ रोजी प्रो कबड्डीमधील पहिला सामना बरोबरीत सोडवला होता. या मोसमात सहा सामने बरोबरीत सुटले होते. यु मुंबा आणि तेलुगू टायटन्स यांनी प्रत्येकी ३ सामने बरोबरीत सोडवले होते. म्हणजे बरोबरीत सुटलेल्या सहा सामन्यांमध्ये हे संघ तीन-तीन वेळा सहभागी होते. एका मोसमात सर्वाधिक तीन सामने बरोबरीत सोडवण्याच्या विक्रम संयुक्तरीत्या या दोन संघाच्या नावावर होता.

प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात हा विक्रम बेंगाल वॉरियर्स आणि यु पी योद्धा संघाने मोडला. या दोन्ही संघानी या मोसमात ४-४ बरोबरीत सोडवले आहेत. यंदाचा मोसम सध्या मध्यावर येऊन ठेपला असल्याने बरोबरीत सुटलेल्या सामन्यात वाढ होऊ शकते आणि बरोबरीत सामन्यांचा विक्रम आणखी वाढू शकतो.

हरयाणा स्टीलर्स, गुजरात फॉरचूनजायन्ट्स आणि पटणा पायरेट्स संघानी या मोसमात प्रत्येकी ३ सामने बरोबरीत सोडवले आहेत. अशी कामगिरी करत त्यांनी यु मुंबा आणि तेलुगू टायटन्स यांच्या पहिल्या मोसमातील विक्रमाची बरोबरी केली आहे.

जर तुम्हाला हे माहिती नसेल तर –
#१ प्रो कबड्डी इतिहासातील पहिला बरोबरीत सुटलेला सामना २८ जुलै २०१४ रोजी झाला होता. तर पाचव्या मोसमाची सुरुवात देखील २८ जुलै रोजीच झाली होती. या दोन्ही घटना मधील आणखी एक योगायोग म्हणजे या दोन्ही सामन्यात तेलुगू टायटन्स हा संघ होता.

#२ प्रो कबड्डीच्या पहिल्या मोसमात बरोबरीत सुटलेल्या सहा सामन्यात सात संघ सहभागी होते. पुणेरी पलटण हा एकमेव संघ होता ज्या संघाने पहिल्या मोसमात एकही सामना बरोबरीत सोडवला नाही.

#३ प्रो कबड्डीमध्ये आजपर्यंत ३१२ सामने खेळवले गेले असून त्यात एकूण आहेत. २६ सामने बरोबरीत सुटले.

#४ एकाच दिवसातील दोन्ही सामने बरोबरीत सुटण्याची ८ सप्टेंबर रोजी झालेली किमया प्रो कबड्डीमध्ये या अगोदर कधीही झाली नव्हती.