रिषभ पंतची धुव्वादार फलंदाजी, दिल्ली सईद मुश्ताक अली स्पर्धेत अंतिम फेरीत

कोलकाता । सईद मुश्ताक अली स्पर्धेत दिल्लीने उत्तर प्रदेशवर ३ धावांनी विजय मिळवत ब गटात अव्वल स्थान मिळवले. या विजयात दिल्लीकडून रिषभ पंतने जोरदार कामगिरी करताना अर्धशतकी खेळी केली.

नाणेफेक जिंकून उत्तर प्रदेशचा कर्णधार सुरेश रैनाने दिल्लीला प्रथम फलंदाजीला पाचारण केले. दिल्लीकडून या सामन्यात सलामीवीर रिषभ पंत (५८) आणि मिलिंद कुमार (३२) या दोन खेळाडूंना सोडून कुणालाही विशेष चमक दाखवता आली नाही.

रिषभ पंतने ३४ चेंडूत ५८ धावा करताना ३ षटकार आणि ५ चौकार खेचले. सईद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने दिल्लीकडून ५८, ४, ०, ५८, ६४, ११६*, ५१, ९ आणि ३८ अशा खेळी केल्या आहेत.

गौतम गंभीरला आज पुन्हा एकदा दिल्लीकडून चांगली खेळी करण्यात अपयश आले. तो १ धावेवर बाद झाला.

दिल्लीने २० षटकांत ९ खेळाडूंच्या बदल्यात १४० धावा केल्या.

उत्तर प्रदेशकडून सर्वच खेळाडूंना धावा केल्या परंतु मोठी धावसंख्या उभारून संघाला विजय मिळवून देण्यात ते अपयशी ठरले. सईद मुश्ताक अली स्पर्धेच्या बाद फेरीत रैनाला प्रथमच अर्धशतकी खेळी करण्यात अपयश आले. तो आज १६ धावांवर बाद झाला.त्यामुळे उत्तर प्रदेश २० षटकांत १० बाद १३७ धावा बनवू शकले.

त्यामुळे उत्तर प्रदेश संघाला ३ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

 या विजयाबरोबर दिल्ली संघाने सईद मुश्ताक अली स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. दिल्ली संघाने यावर्षी रणजी ट्रॉफी स्पर्धेचीही अंतिम फेरी गाठली होती.

आज सुरु असलेल्या राजस्थान विरुद्ध पंजाब सामन्यातील विजेत्या संघाशी ते अंतिम सामन्यात २७ जानेवारी रोजी लढतील.