क्रिकेटमध्ये घडून आला दुर्मिळ योगायोग; दोन्ही सामन्यात धावसंख्या सारख्याच !

काल क्रिकेटमध्ये एक दुर्मिळ असा योगायोग पाहायला मिळाला. झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान संघात दुसऱ्या वनडे सामन्यात अगदी पहिल्या सामन्याच्याच धावसंख्येची पुनरावृत्ती पाहायला मिळाली. फक्त विजयी संघ बदलला.

पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करून ५ बाद ३३३ धावांचा डोंगर उभा केला होता. याच्या प्रतिउत्तरा दाखल झिम्बाब्वे १७९ धावांवर सर्वबाद झाले होते. त्यामुळे अफगाणिस्तानने पहिल्या सामन्यात १५४ धावांनी विजय मिळवला.

दुसऱ्या सामन्यात अगदी अशाच धावसंख्येची पुनरावृत्ती पाहायला मिळाली फक्त या सामन्यात झिम्बाब्वेने विजय मिळवला, तोही १५४ धावांनीच. या सामन्यात झिम्बाब्वेनेही प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ३३३ धावा केल्या आणि त्यांनी अफगाणिस्तानलाही १७९ धावातच सर्वबाद केले.

झिम्बाब्वे विरुद्ध अफगाणिस्तान यांच्या दरम्यान झालेल्या या दुर्मिळ योगायोगाची क्रिकेट जगतात मात्र चांगलीच चर्चा रंगली. या दोन्ही सामन्यात फरक होता तो फक्त विजयी संघाचा आणि दुसरा डाव संपलेल्या षटकांचा. पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेचा डाव ३४.४ षटकात संपुष्टात आला तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा डाव ३०.१ षटकात संपुष्टात आला.

पहिल्या वनडेमध्ये अफगाणिस्तानचा फलंदाज रहमत शाहने ११४ धावांची शतकी खेळी केली होती आणि रशीद खानने अफगाणिस्तानकडून ४ विकेट्स घेतल्या होत्या. तसेच दुसऱ्या वनडेत झिम्बाब्वेचा यष्टीरक्षक फलंदाज ब्रेंडन टेलरने १२५ धावांची शतकी खेळी केली तर झिम्बाब्वेचा कर्णधार ग्रॅमी क्रेमरने ४ विकेट्स घेतल्या होत्या.

झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही ५ सामन्यांची वनडे मालिका पहिल्या दोन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरीत आहे. या मालिकेकडे पुढील महिन्यात झिम्बाब्वेमध्ये २०१९ च्या विश्वचषकासाठी होणाऱ्या पात्रता स्पर्धेचा सराव म्हणून पहिले जात आहे.