आगरी कबड्डी स्पर्धेत दुर्गामाता, भवानीमाता उपांत्य फेरीत

मुंबई । प्रथमेश पालांडे आणि आशिष पालयेच्या तुफानी चढायांच्या जोरावर दुर्गामाता स्पोर्टस् क्लबने जय ब्राह्मणदेवचा 35-25 असा पराभव करून बोकड आणि कोंबड्यासाठी खेळल्या जात असलेल्या आगरी कबड्डी महोत्सव स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.

तसेच भवानीमाता संघाने साई के दिवाने संघाचा 30-14 असा पराभव केला तर एकता संघाने साईराजचे कडवे आव्हान मोडित काढले. त्याचप्रमाणे ओम साईनाथ सेवा ट्रस्टनेही सहज विजयासह उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. आता हे संघ उपांत्य फेरीत एकमेकांशी भिडतील.

प्रभादेवीच्या राजाभाऊ साळवी मैदानात उभारलेल्या किरण पाटील क्रीडानगरीत स्पर्धेच्या तिसऱया दिवशी कबड्डीप्रेमींना फारसा थरारक खेळ पाहण्याची संधी मिळाली नाही. दुर्गामाता आणि जय ब्राह्मणदेव यांच्यातील सामना चुरशीचा झालाच नाही.

दुर्गामाताला प्रथमेश पालांडेने जोरदार सुरूवात करून दिल्यामुळे त्यांच्या संघाने नवव्या मिनीटालाच ब्राह्मणदेववर लोण चढवून आघाडी घेतली आणि मध्यंतराला ती आघाडी 17-9 अशी वाढवली.

मध्यंतरानंतर ब्राह्मणदेवच्या अमोल आणि देवराज या गावंड बंधूंनी आक्रमक खेळ करीत संघाची पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना अपेक्षित यश लाभले नाही आणि त्यांचा संघ 25-35 असा दहा गुणांच्या फरकाने हरला.

भवानी माता आणि साई के दिवाने या संघांत झालेला सामना प्रारंभी समसमान स्थितीत होता. मध्यंतराला गुण फलक 10-8 असा भवानीमाताच्या बाजूने होता. त्यानंतर कल्पेश पवार आणि सिद्धेश परबने खोलवर चढाया करीत पाठोपाठ दोन लोण चढवत सामन्यावर आपली पकड मजबूत केली.

भवानीमाताने हा सामना 30-14 अशा मोठ्या फरकाने जिंकला. साई के दिवानेकडून पुंदन तोंडवलकर आणि साहिल हसुलकर यांनी चांगला खेळ केला.

अन्य एका सामन्यात एकता संघाने साईराज स्पोर्टस्चा पराभव केला. हा सामनाही चुरशीचा झाला. दोन्ही संघात एकापेक्षा एक चढाईपटू असल्यामुळे शेवटची दहा मिनीटे शिल्लक असताना फलकावर 25-23 असा अंक होता.

मात्र शेवटच्या खेळात शुभम आणि रत्नाकर या पाटलांनी जोरदार खेळ करीत आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत 35-27 अशी कायम राखत आपले उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले. तसेच ओम साईनाथने विद्यासागर मंडळाचा 29-16 असा धुव्वा उडवला.