जबरदस्त कामगिरी करणारा मुंबईकर खेळाडू टीम इंडियात का नाही?

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय संघाची सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.

त्यामुळे बीसीसीआयने सोमवारी(24 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या मर्यादीत षटकांच्या मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघात मुंबईच्या श्रेयस अय्यरचा समावेश न करण्यात आल्याने भारताची माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने प्रश्न उपस्थित केला आहे.

श्रेयस अय्यर याआधी ऑस्ट्रेलिया आणि विंडीज विरुद्ध झालेल्या टी20 मालिकांसाठी भारताच्या टी20 संघात होता. मात्र त्याला या दोन्ही मालिकांमधील एकाही सामन्यात अंतिम 11 जणांच्या संघात संधी देण्यात आली नव्हती. तसेच आता त्याला न्यूझीलंड विरुद्ध फेब्रुवारी 2019मध्ये होणाऱ्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघातून वगळण्यात आले आहे.

त्याची मागील काही महिन्यांपासून देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईकडून आणि भारत अ संघाकडून चांगली कामगिरी झाली आहे.

त्याने ऑक्टोबरमध्ये मुंबईचे नेतृत्व करताना विजय हजारे ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून दिले होते. त्याने या स्पर्धेत 93 पेक्षा अधिकच्या सरासरीने 373 धावा केल्या होत्या. तसेच सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये त्याने बडोदा विरुद्ध 139 चेंडूत 178 धावांची धावांची आक्रमक खेळी केली होती. त्याचबरोबर रविवारी सौराष्ट्र विरुद्ध त्याने 60 चेंडूत 83 धावांची खेळी केली होती.

अय्यरच्या अशा कामगिरी नंतरही त्याला भारतीय संघातून वगळण्यात आल्याने आकाश चोप्राने आश्चर्य व्यक्त केले आहे. त्याने त्याचे आश्चर्य व्यक्त करताना ‘श्रेयस अय्यर?’ असे ट्विट केले आहे.

भारतीय संघ 12,15 आणि 18 जानेवारीला अनुक्रमे सिडनी, अॅडलेड आणि मेलबर्न येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सामने खेळणार आहे. तसेच त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध 23,26,28, 31 जानेवारी आणि 3 फेब्रुवारी असे पाच वनडे सामने होणार आहेत. त्यानंतर 6,8 आणि 10 फेब्रुवारीला टी20 सामने होणार आहेत.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, केदार जाधव, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, मोहम्मद शमी.

न्यूझीलंड विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –

विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा(उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद.

महत्त्वाच्या बातम्या:

चाहत्यांचा हल्लाबोल, रिषभ पंतबद्दलचा तो चुकिचा ट्वीट आयसीसीला भोवला

टीम इंडियाचा अजिंक्य रहाणे एक चांगला कर्णधार होऊ शकतो

मिशेल जाॅन्सन प्रकरणात टाईम्स ऑफ इंडिया क्रीडा पत्रकाराच्या मागे ठाम उभे