आरोह, शौर्य, रेडन यांची इंडीकार्टिंग सिरीजमध्ये चमक

मुंबई। 2017 सालचा राष्ट्रीय चॅम्पियन असलेल्या आरोह रविंद्र याने अजमेरा इंडीकार्टिंग सिरिजमध्ये चमक दाखवत प्रो सिनियर गटाचे जेतेपद मिळवले. टीम रायो रेसिंगच्या रविंद्रने रेस 1 व रेस 3 मध्ये विजय मिळवला तर, रेस 2 मध्ये तिसरे स्थान मिळवले. अमरावतीच्या सर्वेश बोडे व मुंबईच्या सैग रईस यांनी रेस 1 मध्ये अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान मिळवले. तर, रेस 3 मध्ये दानेश बानाजी आणि जॉनथन कुरिआकोस यांनी देखील चमक दाखवली.

रेस 2 मध्ये रविंद्रने पिछाडीवरुन जोरदार कामगिरी करत चुरस दाखवली पण, त्याला तिस-या स्थानावरच समाधान मानावे लागले. तर, दानेश बानाजी व राघव वैष्णव यांनी पहिले दोन स्थान पटकावले.वार्षिक कार्टिंग सिरीजमध्ये एफएमएससीआयच्या मान्यतेने गो कार्ट्समध्ये चुरस पहायला मिळते. या स्पर्धेसाठी विविध गटात 500 हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. कश्मिर, केरळ, विजयवाडा, गुजरात, हरयाणा आणि देशातील विविध भागातील स्पर्धक शहरातील मोठ्या मोटरस्पोर्ट्स स्पर्धेत सहभागी झाले होते.

प्रो ज्युनिअर गटात आंतरराष्ट्रीय अनुभव असलेल्या शौर्य कापानी यांनी आपल्या तिन्ही रेसमध्ये चमक दाखवली. रेस 1 मध्ये होशमंद एलाविआ आणि तेज पटेल यांनी छाप पाडली तर, रेस 2 व रेस 3 यामध्ये वीर शेठने दुसरे स्थान मिळवले. दोन्ही रेसमध्ये त्याने होशमंदला मागे टाकले.प्रो कॅडेट गटात 7 ते 12 वर्षातील स्पर्धक सहभागी झाले होते. या गटातील तिन्ही रेसमध्ये रेडन सामेरवेलने निर्वाण चंदना आणि नायजेल शाजु यांपेक्षा सरस कामगिरी केली.

अमॅच्युअर गटात जेमी शॉ ने विजय मिळवला. तिने अयान शर्मा आणि चंदन हेगडेहून सरस कामगिरी केली. महिला गटात डायना पुंडोलेने आघाडी घेतली होती. पण, तिला दुस-याच स्थानी समाधान मानावे लागले. जान्हवी भावसारने या गटात विजेतेपद मिळवले. नमस्वी भुपतानीने तिसरे स्थान पटकावले. आंतरशालेय गटात सेंट लॉरेंस हायस्कूलच्या राघव वैष्णवने बाजी मारली. त्याने पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या तेज पटेलपेक्षा सरस कामगिरी केली. लिलावती पोदार स्कूलचा अझीझ हिरकणी तिस-या स्थानी राहिला.

वेट्रन्स गटात सुरज सिंग भुईने चमक दाखवली. त्याने दानेश बानाजी वा मोनिश जैनपेक्षा सरस कामगिरी केली. अमृत एलास्टोमर्सचे प्रतिनिधित्व करणा-या अमन सिंग भुईने कॉर्पोरेट गटात देखील बाजी मारली. त्यांने हिना जेम्सच्या मोनिश जैन व डिन्स टेक्नोलॉजीच्या अक्षय मोरेला मागे टाकले. आंतरमहाविद्यालयीन गटात जय हिंद कॉलेजच्या जेमी शॉने जेतेपद मिळवले. त्याने कॅथेड्रल व जॉन कॉनन कॉलेजच्या माधव कृष्णअ व शुभम राजे ज्युनिअर कॉलेजच्या अयान शर्माला पछाडले.

खुल्या गटात अमन सिंग भुईने दानेश बानाजी व अक्षय मोरे पेक्षा सरस कामगिरी केली. सिनियर प्लस गटात उत्सव ठक्करने यश दोशीला मागे टाकले तर, राघव वैष्णव गटात तिसरा आला. सर्वेश बोडेने सिनिअर, शौर्य कपानीने ज्युनिअर आणि रेडन सामेरवेल यांनी कॅडेट गटात चमक दाखवली. मुंबईच्या मिहीर पटेलला प्रतिष्ठेच्या अक्षय पाटील स्मृती चषकाने गौरविण्यात आले.

या स्पर्धेसाठी मोठ्या संख्येने स्पर्धकांनी उपस्थिती लावली होती. देशातील सर्वच भागातून रेसर्सने आपला सहभाग नोंदवला होता. यावरुन आपल्याला मोटरस्पोर्ट्सची लोकप्रियता कळून येईल. यावर्षी आम्ही राष्ट्रीय सिरिज सुरु करणार आहोत आणि त्यामध्ये देखील मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. असे आठ वेळचे राष्ट्रीय चॅम्पियन आणि इंडिकार्टिंगचे संस्थापक रायोमंद बानाजी यांनी सांगितले.