हा खेळाडू लग्नामुळे खेळणार नाही आयपीएलच्या पहिल्या सामन्यात

आज आयपीएलच्या ११ व्या मोसमाचे संपूर्ण वेळापत्रक आले आहे. त्यानुसार यावर्षीचा आयपीएलचा मोसम ७ एप्रिल ते २७ मे असा ५१ दिवस होणार आहे. पण या मोसमात किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा खेळाडू ऍरॉन फिंचला त्याच्या लग्नामुळे पहिल्या सामन्याला मुकावे लागणार आहे.

फिंच ७ एप्रिललाच त्याची प्रेयसी एमी ग्रीफिथ्स हिच्याशी विवाहबद्ध होणार आहे. त्यामुळे ८ एप्रिलला होणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब संघात फिरोजशहा कोटला स्टेडिअमवर पार पडणाऱ्या सामन्यासाठी फिंच उपलब्ध नसेल.

त्याचबरोबर त्याचा ऑस्ट्रलिया संघातील संघसहकारी आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलही फिंचच्या लग्नासाठी जाणार असल्याने तोही या पहिल्या सामन्यासाठी अनुपलब्ध असेल.

फिंच cricket.com.au शी बोलताना म्हणाला, “मी सकाळी आयपीएलचे वेळापत्रक पहिले. पण माझे लग्न पुढे घेण्याची कोणतीही संधी नाही.” पुढे फिंच गमतीने हसून म्हणाला, “लग्नाच्या वेळी एमीला सोडून येणे अवघड आहे, नाही का?”

फिंच आणि मॅक्सवेल पहिल्या सामन्यासाठी जरी अनुपलब्ध असले तरी दुसऱ्या सामान्यांपासून ते संघात सामील होतील. पंजाब संघाचा दुसरा सामना १३ एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध होणार आहे. तर दिल्ली डेअरडेव्हिल्सचा दुसरा सामना ११ एप्रिलला राजस्थान रॉयल्स विरुद्ध होणार आहे.

याबद्दल फिंच म्हणाला की, “दुसरा सामना १३ एप्रिलला खेळवला जाणार आहे. त्यामुळे मला थोडा वेळ मिळेल आणि मला सुदैवाने फक्त एकच सामन्याला मुकावे लागणार आहे.”

यासाठी फिंच आणि मॅक्सवेल या दोघांनीही त्यांच्या फ्रँचायझीच्या प्रशिक्षकांचे आभार मानले आहेत. तसेच फिंचने हेदेखील सांगितले की त्याचे बाकी ऑस्ट्रेलियातील संघसहकारी आयपीएलसाठी उपलब्ध असतील.