एबी डिव्हिलियर्स बनला ‘मोब्लां’चा ब्रॅन्ड अॅम्बेसिडर, भारतासह दक्षिण आफ्रिकेत करणार ‘मोब्लां’चे प्रतिनिधीत्व..!!

जगातील दिग्गज क्रिकेट खेळाडूंमध्ये गणल्या जाणारा दक्षिण आफ्रिकेचा आकर्षक फलंदाज एबी डिव्हिलियर्स याला ‘मोब्लां’ने ब्रॅन्ड अॅम्बेसिडर घोषित केले आहे. डिव्हिलियर्स आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेत मोब्लांचे प्रतिनिधीत्व करेल. आतापासून तो सर्व प्रकारच्या उत्पादनांसाठी मोब्लांचा चेहरा असणार आहे. यामध्ये घड्याळ, पेन, चामडी वस्तू, तसेच पुरूषांसाठीच्या उत्पादनांचा समावेश आहे.
दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला ३३ वर्षीय एबी डिव्हिलियर्स एक आक्रमक फलंदाज म्हणून जगभरात लोकप्रिय आहे. फलंदाजीसोबतच तो एक कुशल क्षेत्ररक्षक व प्रतिभावान यष्टीरक्षकही आहे. सध्या तो दक्षिण आफ्रिकेचा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार आहे.
मोब्लांचे सीईओ जेरोम लॅमबर्ट याबाबत बोलताना म्हणाले, मोब्लां परिवाराला आपल्या नव्या ब्रॅन्ड अॅम्बेसिडरच्या रूपात डिव्हिलियर्सचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे. आज डिव्हिलियर्स जगभरातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहेत. क्रिकेटप्रति त्यांची एक खास आणि आगळीवेगळी सकारात्मक अशी शैली आहे. जी मोब्लांशी मिळतीजुळती आहे.
डिव्हिलियर्सने व्यावसायिक टेनिसमध्येही भाग घेतला मात्र शालेय शिक्षणानंतर त्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रीत केले. २००४ मध्ये २० वर्षांचा असताना त्याने सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटमध्ये सहभाग नोंदवला. डिव्हिलियर्सच्या विक्रमांची यादीही भलतीच मोठी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ५०, १०० व १५० धावांचा विक्रम डिव्हिलियर्सच्या नावे आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेकडून सर्वात जलद कसोटी शतक ठोकण्याचा पराक्रमही त्याने केला आहे. विना शून्य सर्वात जास्त कसोटी डाव (७८) खेळण्याचा विक्रमसुद्धा एबीच्याच नावे आहे.
मागील एक दशकापासून दक्षिण आफ्रिकेसाठी उल्लेखनीय कामगिरी करण्याऱ्या या गुणी खेळाडूने भारतातही आपली चमक दाखवली. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स व रॉयल चॅलेंजर्स बँगलोर या संघांकडून खेळताना डिव्हिलियर्सने करोडो भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत. एबी डिव्हिलियर्स जगभरातील अगणित लोकांसाठी एक प्रेरणास्थान आहे. क्रीडाक्षेत्रात आपले खास व्यक्तिमत्व आणि बहुआयामी प्रतिभा दाखवणारा सर्वांचा लाडका एबी डिव्हिलियर्स आता मोब्लांसोबत एक नवी भूमिका पार पाडताना दिसेल.