दक्षिण आफ्रिकेचे हे दोन मोठे खेळाडू अर्धशतक करून झाले बाद

केपटाऊन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या सत्रात दक्षिण आफ्रिकेचे एबी डिव्हिलियर्स आणि फाफ डुप्लेसिस हे दोन्ही धडाकेबाज फलंदाज अर्धशतक करून बाद झाले आहेत.

डिव्हिलियर्सला जसप्रीत बुमराहने त्रिफळाचित बाद करून आफ्रिकेला चौथा धक्का दिला. बुमराहने आजच कसोटी पदार्पण केले आहे आणि त्याला त्याचा कसोटीतील पहिलाच बळी डिव्हिलियर्स या मोठ्या फलंदाजांचा मिळाला आहे. डिव्हिलियर्सने ८४ चेंडूत ६५ धावांची खेळी केली.

यानंतर काही वेळातच हार्दिक पंड्याने डुप्लेसिसला झेलबाद केले. रिद्धिमान सहाने त्याचा झेल घेतला. डुप्लेसिसने १०४ चेंडूत ६२ धावा केल्या आहेत.

याआधी सामन्याच्या सुरुवातीलाच पहिल्या सत्रात भुवनेश्वरने दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या तीनही फलंदाजांना लवकर बाद केले होते. मात्र त्यानंतर डिव्हिलियर्स आणि डुप्लेसिसने संघाचा डाव सावरत ११४ धावांची शतकी भागीदारी रचली होती.

सध्या दक्षिण आफ्रिकाच्या ४० षटकात ५ बाद १७४ धावा झाल्या आहेत. क्विंटॉन डिकॉक आणि व्हर्नोन फिलँडर हे दोघे नाबाद खेळत आहेत