आयपीएलमध्ये असा पराक्रम करणारा डिविलियर्स दुसराच क्रिकेटपटू

मुंबई। सोमवारी(15 एप्रिल) वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात सामना पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला 5 विकेट्सने पराभव स्विकारावा लागला आहे.

असे असले तरी मात्र बेंगलोरचा दिग्गज क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने आयपीएलमध्ये खास विक्रम केला आहे. त्याने या सामन्यात 51 चेंडूत 79 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 4 षटकार मारले. याबरोबरच त्याने आयपीएलमध्ये 200 षटकारांचा टप्पाही पार केला.

आयपीएलमध्ये 200 षटकारांचा टप्पा पार करणारा तो केवळ दुसरा फलंदाज ठरला आहे. डिविलियर्सचे आयपीएलमध्ये आता 149 सामन्यात 203 षटकार झाले आहेत. याआधी आयपीएलमध्ये 200 षटकारांचा टप्पा ख्रिस गेलने पूर्ण केला होता.

विशेष म्हणजे गेलने आयपीएलमध्ये 300 षटकारांचा टप्पाही पार केला असून हा टप्पा पार करणारा तो पहिला आणि एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 120 सामन्यात 315 षटकार मारले आहेत.

डिविलियर्सने धोनी, गंभीरलाही टाकले मागे – 

डिविलियर्सने मुंबई विरुद्ध अर्धशतकी खेळी करताना आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत एमएस धोनी आणि गौतम गंभीरला मागे टाकले आहे. डिविलियर्सने आत्तापर्यंत आयपीएलमध्ये 149 सामन्यात 40.18 च्या सरासरीने 4260 धावा केल्या आहेत. त्यामुळे तो आता या यादीत 8 व्या क्रमांकावर आला आहे.

त्याच्या पाठोपाठ 9 व्या क्रमांकावर धोनी असून त्याने 183 सामन्यात 41.22 च्या सरासरीने 4246 धावा केल्या आहेत. तर माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने 154 सामन्यात 31.23 च्या सरासरीने 4217 धावा केल्या आहेत. गंभीर या यादीत 10 व्या क्रमांकावर आहे.

सोमवारी झालेल्या सामन्यात डिविलियर्सने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 बाद 171 धावा करत मुंबई समोर 172 धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान मुंबईने 19 षटकातच 5 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू – 

315 – ख्रिस गेल (120 सामने)

203 – एबी डिविलियर्स (149 सामने)

196 – एमएस धोनी (183 सामने)

190 – सुरेश रैना (184 सामने)

189 – रोहित शर्मा (180 सामने)

182 – विराट कोहली (171 सामने)

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषकात या भारतीय क्रिकेटपटूला गोलंदाजी करण्याची लसिथ मलिंगाला वाटते भीती

आयपीएलच्या मध्यावर मुंबई इंडियन्सला बसला मोठा धक्का…

२०१९ विश्वचषकासाठी बांगलादेश संघाची घोषणा, एकही वनडे न खेळलेल्या खेळाडूला मिळाली संधी