डिव्हिलियर्स चौथ्या वनडेतून करणार पुनरागमन

दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्स भारताविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात पुनरागमन करणार आहे. तो बोटाच्या दुखापतीमुळे पहिल्या तीन सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता.

डिव्हिलियर्सला भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी दरम्यान बोटाची दुखापत झाली होती. पण आता तो या दुखापतीतून सावरला असल्याने चौथ्या वनडेत खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पहिल्या तीन वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेला भारताने पराभूत केले आहे. त्यामुळे डिव्हिलियर्सच्या परतण्याने दक्षिण आफ्रिकेला मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच त्यांचा नियमित कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि क्विंटॉन डिकॉक हे देखील दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका संघातून बाहेर पडले आहेत. त्यांना वनडे मालिकेनंतर होणाऱ्या टी २० मालिकेलाही मुकावे लागणार आहे.

डिव्हिलियर्सच्या पुनरागमनाबद्दल जेपी ड्युमिनी तिसऱ्या वनडे नंतर म्हणाला होता की “डिव्हिलियर्सच्या परत येण्याने मोठा फरक पडणार आहे. तो वनडेमध्ये जगातील सर्वोत्तम खेळांडूंपैकी एक आहे. तो संघात आत्मविश्वास आणेल तसेच त्याच्या नेतृत्व गुणाचाही संघाला फायदा होईल.”

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यातील हा चौथा वनडे सामना उद्या जोहान्सबर्गला होणार आहे. हा सामना गुलाबी सामना म्हणून खेळवण्यात येणार आहे. स्तनाच्या कर्करोगाची जागरूकता म्हणून हा गुलाबी सामना ओळखला जातो. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ गुलाबी जर्सी परिधान करून मैदानात उतरेल.भारताने या ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली आहे. 

असा असेल दक्षिण आफ्रिकेचा शेवटच्या तीन वनडेसाठीचा संघ: एडिन मार्करम(कर्णधार), हाशिम अमला, एबी डिव्हिलियर्स, जेपी ड्युमिनी, इम्रान ताहीर, हेन्रिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मोर्ने मॉर्केल, ख्रिस मॉरीस, लुंगीसानी एन्गिडी,अँडिल फेहलूकवयो, कागिसो रबाडा, ताब्राईझ शम्सी, खाया झोन्डो, फरहान बेहार्डीन