तो खेळाडू म्हणतो एबी डिव्हिलिअर्स करतोय देश आणि संघाचा अपमान !

केप टाउन- दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू हर्षल गिब्सने एबी डिव्हिलिअर्सचा चांगलाच समाचार घेतला आहे. डिव्हिलिअर्सच्या मनाला वाटले तेव्हा कसोटी खेळण्याच्या भूमिकेबद्दल गिब्सने जोरदार टीका केली आहे.

एबी डिव्हिलिअर्स गेल्या १९ महिन्यात एकही कसोटी सामना खेळलेला नाही. डिव्हिलिअर्स संघात नसल्यामुळे १९९८ नंतर प्रथमच आफ्रिका इंग्लंडमध्ये ३-१ अशी मोठ्या पराभवाला सामोरे गेली.

३३ वर्षीय डिव्हिलिअर्सने जानेवारी महिन्यात कसोटी क्रिकेटपासून थोडी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरून तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये दुखापतग्रस्त न होता खेळेल. तसेच आपली क्रिकेट कारकीर्द वाढवू शकेल.

इंग्लंडवरून परत आल्यावर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डुप्लेसीने एबी डिव्हिलिअर्सच्या कसोटी न खेळण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना त्याला काय निर्णय घ्यायचा आहे याच डिव्हिलिअर्सला स्वातंत्र्य असल्याचं म्हटलं होत. डुप्लेसीच्या या व्यक्तव्याचा समाचार घेताना गिब्सने कोणताही कर्णधार असं वक्तव्य करूच कसे शकतो असे म्हटले आहे.

गिब्सने ट्विटच्या माध्यमातून डिव्हिलिअर्स आणि कॅलिस यांच्या महानतेबद्दल वक्तव्य करताना कुणीही खेळाडू खेळापेक्षा महान नसल्याचं म्हटलं आहे.

गिब्स म्हणतो, ” कॅलिसने कारकिर्दीत अनेक गोष्टी एबीपेक्षा अधिक मिळवल्या आहेत. तो खूप काळ क्रिकेट खेळला. परंतु त्याने कधीच संघ आणि खेळाचा अपमान केला नाही. त्याने निवृत्तीचा निर्णय स्वतः घेतला. कुणाला ताटकळत ठेवलं नाही. ”

डिव्हिलिअर्स आजपर्यंत आफ्रिकेकडून १०६ कसोटी, २२२ एकदिवसीय आणि ७६ टी२० सामने खेळला आहे. त्यात त्याने १९००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.