दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका; हा खेळाडू दुखापतीमुळे मुकणार टी २० मालिकेला

जोहान्सबर्ग। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात आजपासून टी २० मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेच्या सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. त्यांचा स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स गुडघा दुघपतीमुळे टी २० मालिकेबाहेर गेला आहे.

याआधीही वनडे मालिकेत डिव्हिलियर्सला पहिल्या तीन सामन्यांना बोटाच्या दुघपतीमुळे मुकावे लागले होते. त्यानंतर त्याने चौथ्या वनडेतून संघात पुनरागमन केले होते. परंतु त्याला शेवटच्या तीनही वनडेत विशेष कामगिरी करण्यात अपयश आले होते. आता पुन्हा एकदा तो दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे.

याबद्दल प्रभारी कर्णधार जेपी ड्युमिनीने नाणेफेकीच्या वेळी सांगितले की, “एबी डिव्हिलियर्सला शेवटच्या वनडे सामन्यात गुडघा दुखापत झाल्याने तो ही टी २० मालिका खेळू शकणार नाही. आम्ही आज संघात काही नवीन चेहेऱ्यांना संधी दिली आहे. वनडे मालिकेतील अपयश विसरून आम्हाला या मालिकेत केळवे लागेल. “

मागील काही दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेच्या संघाला दुखापतीने घेरले आहे. भारताविरुद्ध वनडे मालिका सुरु असतानाच दक्षिण आफ्रिकेचा नियमित कर्णधार फाफ डूप्लेसिस बोटाच्या दुखापतीमुळे आणि क्विंटॉन डिकॉक मनगटाच्या दुखापतीमुळे उर्वरित वनडे आणि आजपासून सुरु झालेल्या टी २० मालिकेतून आधीच आहेर पडले आहेत.

नियमित कर्णधार डूप्लेसिसच टी २० मालिकेला मुकणार असल्याने टी २० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचे प्रभारी कर्णधारपद जेपी ड्युमिनीला देण्यात आले आहे.