ऑल इंडिया निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धा- आझम स्पोर्ट्स अकादमी संघाला विजेतेपद

पुणे : प्रज्ञा वीरकर व तेजल हसबनीस यांच्या दमदार खेळाच्या जोरावर आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने हरयाणा संघाला ८ गडी राखून पराभूत करतना ‘पाचव्या आबेदा इनामदार ऑल इंडिया निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धे’चे विजेतेपद पटकावले.

स्पर्धेचे बक्षीस वितरण रणजी खेळाडू नौशाद शेख, एमसीई सोसायटीचे विश्वस्त शाहीद शेख, आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाचे उपमुख्याध्यापक गफार सय्यद, आझम स्पोर्ट्स अकादमीचे संचालक गुलझार शेख यांच्या हस्ते करण्यात आले. आझम स्पोर्ट्स अकादमीच्या सोनल पाटीलला ‘सर्वोत्तम गोलंदाज’, हरयाणाच्या तन्नू जोशीला ‘सर्वोत्तम फलंदाज’ तर आझम स्पोर्ट्स अकादमीच्या गौतमी नाईकला ‘सर्वोत्तम खेळाडू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अंतिम लढतीत हरयाणा संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र प्रज्ञा वीरकरच्या भेदक गोलंदाजीसमोर हरयाणा संघाचा डाव निर्धारित २० षटकांत ९ बाद ६२ धावांवर आटोपला. प्रज्ञा वीरकरने ८ धावांत ३ गडी बाद केले. तिला सोनल पाटीलने २ तर, प्रिया सिंग, गौतमी नाईक व किरण नवगिरे यांनी प्रत्येकी १ गडी बाद करताना सुरेख साथ दिली. हरयाणा संघाकडून परमिला कुमारी व भारती कश्यप यांनी प्रत्येकी ९ धावांची खेळी केली. आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने ८.४ षटकांत १ बाद ६३ धावा करताना विजय साकारला. तेजल हसबनीसने १५ चेंडूत ६ चौकार व १ षटकांच्या मदतीने ३८ धावांची खेळी केली. तिला किरण नवगिरेने १२ चेंडूत ३ चौकारांच्या सहाय्याने २४ धावांची खेळी केली. हरयाणा संघाच्या रितू भाटीने १ गडी बाद केला. प्रज्ञा वीरकरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या लढतीमध्ये वेरॉक क्रिकेट अकादमी संघाने वूमन्स स्पोर्ट्स असोसिएशन संघाला पराभूत केले. वूमन्स स्पोर्ट्स अकादमी संघाने निर्धारित १० षटकांत ५ बाद ६० धावा केल्या. शिवली शिंदेने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. वेरॉक क्रिकेट अकादमी संघाने ७.३ षटकांत ६१ धावा करताना विजय साकारला. खुशी मुल्लाने २७ (३ चौकार) तर मानसी तिवारीने ३० (५ चौकार) धावांची खेळी करताना संघाला विजय मिळवून दिला. मानसी तिवारीला सामानावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक : हरयाणा : २० षटकांत ९ बाद ६२ (परमिला कुमारी ९ (६ चेंडू, १ चौकार), भारती कश्यप ९ (१० चेंडू, १ चौकार) प्रज्ञा वीरकर ४-१-८-३, सोनल पाटील २-०-११-२, किरण नवगिरे ४-१-१०-१, गौतमी नाईक २-०-४-१, प्रिया सिंग २-१-३-१) पराभूत विरुद्ध आझम स्पोर्ट्स अकादमी : ८.४ षटकांत १ बाद ६३ (तेजल हसबनीस ३८ (१५ चेंडू, ६ चौकार, १ षटकार), किरण नवगिरे २४ (१२ चेंडू, ३ चौकार), रितू भाटी ३-०-१६-१)