पुण्याचा अभिजित कटके आणि साता-याचा किरण भगत यांच्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत रंगणार

पुणे : पुण्याचा अभिजित कटके आणि साता-याचा किरण भगत यांच्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम लढत रंगणार आहे. अभिजित गादी विभागात विजयी ठरला, तर माती विभागात किरणने बाजी मारली. अंतिम लढत रविवारी संध्याकाळी रंगणार आहे.
समस्त ग्रामस्थ भूगाव, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ, मुळशी तालुका कुस्तीगीर संघ व  मल्लसम्राट प्रतिष्ठान यांच्या वतीने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ६१ वी वरिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा भूगाव येथील मामासाहेब मोहोळ क्रीडानगरीत सुरू आहे. 
गादी विभागाच्या अंतिम फेरीत अभिजितने बीडच्या अक्षय शिंदेला नमविले. अतिशय रंगलेल्या या कुस्तीत  सुरुवातीपासूनच अभिजित आक्रमक होता. त्याने अक्षयला चाल करण्याची संधीच दिली नाही.
सुरुवातीलाच अक्षयचा ताबा घेत आणि त्यानंतर एकेरी पट काढून पाठीवर जाऊन एका मिनिटातच ४ गुणांची कमाई केली. अक्षयला कुस्ती खेळू न देता अतिशय चपळाईने हाफ्ते काढून पुन्हा २ गुण त्याने मिळविले. हाफ्ते डावाची बांधणी करुन २ आणि भारंदाज डावावर २ अशी एकूण १० गुणांची कमाई करीत बीडच्या अक्षय शिंदेचा त्याने पराभव केला.
* बुलढाण्याचा बालारफीक चितपट 
माती विभागातील अंतिम फेरीत किरणने बुलढाण्याच्या बालारफीक शेखला नमविले. या कुस्तीमध्ये तिस-याच मिनिटाला किरण भगतने बालारफीक शेखला चितपट केले. उपांत्य फेरीत बालारफीक शेखने पुण्याच्या तानाजी झुंजुरकेला नमविले, तर किरण भगतने १०-० ने सूरज निकमचा पराभव केला. 
* कुस्ती ही कटके घराण्याची परंपरा – अभिजीतची पाचवी पिढी 
पुण्याचा अभिजीत कटके हा अमर निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश पेठेतील शिवरामदादा तालमीत सराव करतो. अतिशय कमी वयात कुस्तीमध्ये त्याने उत्तम पकड मिळविली आहे.
कटके घराण्यामध्ये पैलवानकीची परंपरा असून अभिजीतच्या रुपाने पाचवी पिढी कुस्तीमध्ये आहे. आर्मी स्पोर्टस् मध्ये देखील तो सराव करतो. भरत म्हस्के, हणमंत गायकवाड आणि तालमीचे वस्ताद गुलाब पटेल यांचे देखील त्याला मार्गदर्शन मिळते. त्याचे प्रशिक्षक अमर निंबाळकर यांच्या मते, ताकद हे अभिजीतचे मुख्य वैशिष्टय आहे. 
प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा अंदाज घेऊन योग्य वेळी योग्य खेळी तो करतो. पुढील सरावातून तो आॅलिंपीकसाठी देखील पात्र होईल. सकाळी ४,३० वाजता त्याचा दिवस सुरु होतो. ज्युस, बदाम, थंडाई, तूप, आठवडयातून चार वेळा मांसाहार असा त्याचा आहार आहे.
प्रतिदिन २ ते ३ हजार आणि महिन्याचा ६० ते ७० हजार रुपये त्याचा खर्च आहे. इयत्ता १२ वीची बहिस्थ परीक्षा तो देत आहे. मागील वर्षी झालेल्या स्पर्धेमध्ये उपमहाराष्ट्र केसरी व यावर्षी झालेल्या स्पर्धेत उपहिंद केसरीचा किताब त्याने पटकाविला आहे.