सामना अनिर्णित राखण्यासाठी त्याने १०८ चेंडूत केल्या चक्क ८ धावा

मुंबई । वानखेडे स्टेडिअमवर पार पडलेल्या मुंबई विरुद्ध बडोदा संघातील रणजी सामन्यात काल अखेरच्या दिवशी सामना अनिर्णित राहिला. परंतु बडोद्याने पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर ३ गुण मिळवले. मुंबईने दिवसाखेर ७ बाद २६० धावा केल्या.

हा सामना एकवेळ डावाने पराभूत होईल की काय अशी परिस्थिती होती. परंतु गेली ८४ वर्ष मुंबई संघातील एक गोष्ट कायम आहे ती म्हणजे खडूस वृत्ती. मुंबईने तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात ४ बाद १०२ धावा केल्या होत्या. चौथ्या दिवशी पराभवाची खरी तर औपचारिकता बाकी होती.

परंतु अजिंक्य रहाणे १३४ चेंडूत ४५, सूर्याकुमार यादव १३२ चेंडूत ४४ आणि सिद्देश लाड २३८ चेंडूत ७१ यांनी अतिशय जबाबदार खेळी केली. परंतु खास लक्षात राहिली ती खेळी अनुभवी खेळाडू अभिषेक नायरची. त्याने १०८ चेंडूत धावा केल्या ८. त्याचा स्ट्राइकरेट होता ७.४१.

नायरची ही खेळी अतिशय संयमी आणि महत्वपूर्ण ठरली. सामन्याचा हिरो मुंबईसाठी सिद्देश लाड ठरला परंतु त्याला तेवढीच चांगली साथ या देशांतर्गत क्रिकेटमधील महान रणजीपटूने दिली.

मुंबई संघ गेल्या ६६वर्षात केवळ एकदा डावाने रणजी सामन्यात पराभूत झाला आहे आणि हा संघ डावाने कधीही गेल्या ६६वर्षात मुंबईमध्ये पराभूत झाला नाही. सिद्धेश लाड आणि अभिषेक नायर यांच्या खेळीने हा विक्रम अबाधित ठेवला.

मुंबई विरुद्ध १५वेळा विरोधी संघाने ५५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत आणि मुंबई एकदाही सामना पराभूत झाली नाही.

संक्षिप्त धावफलक:
मुंबई पहिला डाव: सर्वबाद १७१ धावा
बडोदा पहिला डाव :९ बाद ५७५ धावा (घोषित)
मुंबई दुसरा डाव: ७ बाद २६० धावा

सामनावीर: स्वप्नील सिंग (१६४ धावा आणि २ बळी)