विश्वचषकातही हवी आयपीएल प्लेऑफसारखी पद्धत – रवी शास्त्री

2019 विश्वचषकला 30 मे पासून इंग्लंड आणि वेल्स येथे सुरुवात होणार आहे. या विश्वचषकासाठी सहभागी संघ इंग्लंडमध्ये दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. भारतीय संघही बुधवारी(22 मे) इंग्लंडला पोहचला आहे.

इंग्लंडला रवाना होण्याआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक  रवी शास्त्री यांची मुंबईमध्ये पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पत्रकारांशी बोलताना शास्त्री यांनी  विश्वचषकात उपांत्य सामन्यांऐवजी आयपीएलमधील प्लेऑफसारखी पद्धत असायला हवी असे मत व्यक्त केले आहे.

शास्त्री म्हणाले, ‘मी नेहमीच म्हटले आहे की आयपीएलची पद्धत चांगली आहे. तूम्हाला भविष्य माहित नसते. कदाचीत आयसीसीही पावसाच्या शक्यतेमुळे याचा विचार करु शकते. सध्याच्या घडीला आपण फक्त दुर्दैव म्हणू शकतो. कारण हे असे नाही की तूम्ही यासाठी तयारी करु शकता. तूम्हाला निसर्गाचा हस्तक्षेप आणि दुर्दैव माहित आहे.’

याबरोबरच शास्त्री म्हणाले, ‘ही स्पर्धा एक चांगली संधी आहे. आपला संघ मागील पाच वर्षांपासून चांगला खेळ करत आहे. सध्याच्या घडीला विश्वचषकाची मजा घेणे गरजेचे आहे. आम्ही जर पूर्ण क्षमतेने खेळलो तर विश्वचषक जिंकू शकतो. या विश्वचषकाची पद्धतही आव्हानात्मक आहे. ही कठिण स्पर्धा आहे. पण साखळी फेरीत 9 सामने खेळायचे असल्याने ही एक सकारात्मक गोष्ट आहे.’

यावर्षीचा हा विश्वचषक 1992 च्या विश्वचषकाच्या पद्धती प्रमाणे खेळवला जाणार आहे.

यावर्षीच्या विश्वचषकामध्ये सर्व संघ साखळी फेरीत आमने-सामने येणार आहेत. तसेच गुणतालिकेत अव्वल चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

त्यामुळे अव्वल क्रमांकाचा संघ चौथ्या क्रमांकाच्या संघाशी आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघ तिसऱ्या क्रमांकावरील संघाशी उपांत्य सामना खेळेल. या दोन उपांत्य सामन्यात जे दोन संघ विजयी ठरतील ते अंतिम सामन्यात प्रवेश करतील.

आयपीएलच्या प्लेऑफची पद्धत यापेक्षा थोडी वेगळी असून यामध्ये दोन क्वालिफायर आणि एक एलिमिनेटरचा सामना होतो.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

विश्वचषकाआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने टीम इंडियाला दिला खास सल्ला…

काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पणातच अजिंक्य रहाणेची शतकी खेळी, पहा व्हिडिओ