थायलंडविरुद्ध भारताच्या सलामीची उत्सुकता

अबुधाबी: एएफसी आशियाई करंडक फुटबॉल स्पर्धेत भारताची सलामी रविवारी थायलंडविरुद्ध होत आहे. आठ वर्षांच्या खंडानंतर भारताने या खंडीय स्पर्धेतील स्थान नक्की केले. त्यामुळे भारताच्या सलामीविषयी उत्सुकता आहे.
अबुधाबीतील अल नाह्यान स्टेडियमवर ही लढत होईल. या स्पर्धेतील आव्हानाला सामोरे जाण्याची क्षमता असल्याचे दाखवून देण्याचा भारताचा प्रयत्न राहील. भारताच्या एकूणच मोहिमेविषयी उत्सुकता आहे. मुख्य प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टंटाईन यांच्या संघासमोरील आव्हान मात्र खडतर असेल. भारताचा अ गटात समावेश आहे. थायलंडशिवाय बहारीन आणि संयुक्त अरब अमिराती हे भारताचे प्रतिस्पर्धी आहेत.
 
रविवारचा प्रतिस्पर्धी थायलंड जबरदस्त फॉर्मात आहे. थायलंडने गोलंचा धडाका लावला आहे. त्यामुळे ब्ल्यू टायगर्सच्या बचाव फळीला दक्ष राहावे लागेल. संदेश झिंगन याच्या नेतृत्वाखालील बचाव फळी आणि गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधू यांची कसोटी लागलेली असेल.
 
कॉन्स्टंटाईन यांनी सांगितले की, आमच्यावर दडपण नाही. चार वर्षांपूर्वी आमच्याकडून कुणालाच पात्रतेची अपेक्षा नव्हती. आम्ही पात्र ठरलो तेव्हा तिन्ही सामने हरू असे प्रत्येकाला वाटते. आता आम्ही येथे येऊन सहभागी होण्याच्या योग्यतेचे आहोत हे सिद्ध करून दाखविण्याची जबाबदारी आमच्यावर आहे.
 
थायलंडने गेल्या सहा सामन्यांत 17 गोल केले आहे. अशा संघाविरुद्ध बचाव फळी चांगली कामगिरी करेल असा विश्वास कॉन्स्टंटाईन यांना वाटतो. चीन आणि ओमानविरुद्ध भारताचे मित्रत्वाचे सामने झाले. त्यात अनास एडाथोडिका आणि झिंगन यांची जोडी चांगली जमली होती. या दोन्ही लढती भारताने बरोबरीत सोडविल्या.
 
प्रीतम कोटल आणि नारायण दास हे मध्य रेषेवरील भरवशाचे खेळाडू आहेत. त्यांच्यापुढे उदांता सिंग, हालीचरण नर्झारी किंवा आशिक कुरुनीयन असे खेळाडू आहेत. अनिरुध थापा आणि प्रोणय हलदर यांनी भक्कम जोडी निर्माण केली आहे. त्यांची कामगिरी महत्त्वाची ठरेल. याचे कारण थायलंडकडे चेंडूवर ताबा ठेवण्याची आणि खेळाच्या वेगात झटपट बदल करीत प्रतिस्पर्ध्याला धक्का देण्याची क्षमता आहे.
 
भारतासाठी सुनील छेत्री पुन्हा आघाडीवर असेल, पण भारतातर्फे सर्वाधिक गोल केलेल्या या खेळाडूसमोर थायलंडच्या चिवट बचाव फळीचे आव्हान असेल. त्यांच्या चिवटपणामुळे थायलंडने 20 पैकी नऊ सामन्यांत क्लीन-शीट राखली आहे. अलिकडे थायलंडची कामगिरी मात्र काहीशी घसरली आहे. ओमानविरुद्ध मित्रत्वाच्या सामन्यात त्यांचा पराभव झाला. हा निकाल भारताचा विश्वास वाढविणारा आहे.
 
थायलंडचे प्रशिक्षक मिलोवान राजेवॅच यांनी सांगितले की, आमचे किमान ध्येय बाद फेरी गाठण्याचे आहे. आमचे काही कमकुवत दुवे आहेत ओमानविरुद्धच्या लढतीतून ते स्पष्ट झाले. या घडीला आम्हाला सरावाच्या या लढतीमधील निकाल विसरावा लागेल आणि भारताविरुद्धच्या लढतीवर लक्ष केंद्रीत करावे लागेल.
 
सर्बियाच्या मिलोवान यांनी सुत्रे स्विकारल्यापासून थायलंडने आक्रमणाला काहीशी मुरड घातली आहे, पण तरिही ते भेदक खेळ करतात. आधीच्या अतीउत्साही दृष्टिकोनाला फाटा देत त्यांनी संघात संतुलन आणले आहे. त्यांच्या या धोरणाला आश्चर्यकारक फळ मिळाले आहे. एएफएफ करंडक स्पर्धेत मलेशियाविरुद्धचा उपांत्य सामना केवळ यास अपवाद ठरला.
त्या सामन्यातील पराभवामुळे स्पर्धेतील आव्हान संपल्यानंतर ओमानविरुद्ध पराभव झाला. त्यामुळे मिलोवान यांच्यावरील दडपण वाढले आहे. अशावेळी भारताविरुद्ध चांगला खेळ करण्यास थायलंडचा संघ आतूर असेल.
 
भारतीय संघ मात्र आपल्याला संधी असल्याच्या विश्वासाने मैदानावर उतरेल. मोहिमेची सुरवात सकारात्मक करण्याची भारताला आशा असेल.
 
थेट प्रक्षेपण: भारतीय वेळेनुसार सायंकाळी 7 पासून