काबुल हल्ल्यामुळे अफगाणिस्तानने केली पाकिस्तनबरोबरची क्रिकेट मालिका रद्द

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने काल पाकिस्तान संघाबरोबरची काबुल येथे होणारी क्रिकेट मालिका रद्द केली. याची अधिकृत घोषणा अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून काल रात्री अधिकृत घोषणा केली.

काबुल हल्ल्यात अफगाणिस्तानचे अंदाजे ९० नागरिक दगावले तर १०० हुन अधिक जखमी झाले. यामुळे एसीबी अर्थात अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ह्याच वर्षी पाकिस्तान बरोबर ठरलेले सर्व मैत्रीपूर्ण लढती रद्द केल्या. यात पाकिस्तान काबुल येथे पहिली टी२० खेळणार होत तर त्यानंतर पाकिस्तान येथे एक मालिका होणार होती. त्या मालिकेचं वेळापत्रक अजून निश्तित झालं नव्हतं. अफगाणिस्तानच्या इंटेलिजन्स एजेन्सीने या सर्व प्रकारामध्ये आयएसआयचा हात असल्याचं म्हटलं आहे.

एसीबीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की ज्या देशात दहशतवादाला पाठिंबा दिला जातो अशा देशाबरोबर आम्ही क्रिकेट पुढे नेऊ शकत नाही. अफगाणिस्तानमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य देतो. त्यामुळेच आम्ही सर्व सामने आणि करार संपुष्टात आणले आहेत.

भारतानानंतर पाकिस्तान बरोबर क्रिकेटमालिका दहशतवादी हल्ल्यामुळे रद्द करणारा अफगाणिस्तान हा क्रिकेट जगतातील दुसरा देश ठरला आहे.