एशिया कप २०१८: स्पर्धेबाहेर होणारा श्रीलंका ठरला पहिला संघ; अफगाणिस्तानने दिला पराभवाचा धक्का

अबुधाबी। अफगाणिस्तानने त्यांची एशिया कपची सुरुवात विजयाने करताना पुढील फेरीतील प्रवेशही केला निश्चित केला आहे. त्यांनी 17 सप्टेंबरला साखळी फेरीत श्रीलंकेविरुद्ध 91 धावांनी विजय मिळवला आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने श्रीलंकेसमोर विजयासाठी 250 धावांचे आव्हान ठेवले होते. पण श्रीलंकेचा डाव 41.2 षटकात 158 धावांवरच संपुष्टात आला.

सलामीवीर फलंदाज कुशल मेंडीसची विकेट पहिल्याच षटकात गेल्याने श्रीलंकेची सुरुवात अडखळत झाली. मात्र त्यानंतर उपुल थरंगा(36) आणि धनंजय डी सिल्वा यांनी 53 धावांची अर्धशतकी भागीदारी रचत श्रीलंकेला सावरले होते.

मात्र 14 व्या षटकात धनंजय 23 धावांवर असताना धावबाद झाला आणि ही जोडी फुटली. त्यानंतर काही वेळात कुसल परेराला(17) राशीद खानने त्रिफळाचीत करत श्रीलंकेला तिसरा धक्का दिला.

त्यानंतर कर्णधार अँजेलो मॅथ्यूज(22), शेहान जयसुर्या(14) आणि थिसरा परेरा(28) यांनी थोडीफार लढत दिली. मात्र खेळपट्टीवर जम बसल्यावर त्यांनीही विकेट गमावल्या. त्यामुळे श्रीलंका संघ अडचणीत आला.

श्रीलंकेच्या वरच्या आणि मधल्या फळीतील विकेट लवकर गेल्यानंतर तळातल्या फलंदाजांनाही काही खास करता आले नाही. दसून शनाकाला तर भोपळाही फोडता आला नाही. त्याला मुजीब उर रेहमानने त्रिफळाचीत केले.

अफगाणिस्तानकडून राशीद खान(2/26), मुजीब उर रेहमान(2/32), मोहम्मद नबी(2/30) आणि गुलबदीन नाईबने (2/29) विकेट्स घेतल्या.

तत्पूर्वी श्रीलंकेकडून थिसरा परेराने 5 विकेट्स घेऊन अफगाणिस्तानचा डाव 249 धावांवर संपुष्टात आणण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. अफगाणिस्तानकडून मोहम्मद शेहजाद आणि इहसानुल्लाहने 57 धावांची सलामी भागीदारी करत चांगली सुरुवात केली होती.

पण ही जोडी फोडण्यात अकिला धनंजयाला यश आले. त्याने शेहजादला 34 धावांवर असताना बाद केले. त्यानंतरही अफगाणिस्तानने त्यांचा चांगला खेळ कायम ठेवला. तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आलेल्या रेहमत शहाने सलामीवीर इहसानुल्लाहसह दुसऱ्या विकेटसाठी 50 धावा जोडल्या.

पण 45 धावांवर असताना इहसानुल्लाह बाद झाला. त्यालाही धनंजयानेच बाद केले. त्याच्या पाठोपाठ कर्णधार असघर अफगाणही लगेचच बाद झाला. असे असले तरी नंतर हशमतुल्लाह शाहिदीने(37) खेळपट्टीवर स्थिर झालेल्या रेहमतला चांगली साथ देताना चौथ्या विकेटसाठी 80 धावांची भागीदारी रचली.

मात्र 90 चेंडूत 72 धावांवर असताना दुश्मंथा चमिराने रेहमतला थिसेरा परेराकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर मात्र अफगाणिस्तानच्या तळातल्या फलंदाजांनी नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या.

अफगाणिस्ताच्या तळातल्या फलंदाजांना बाद करण्यात थिसेरा परेराने मोलाचा वाटा उचलला.

श्रीलंकेकडून थिसेरा परेराने 55 धावात सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. अन्य गोलंदाजांपैकी शेहान जयसुर्या(1/22), अकिला धनंजया(2/39), लसिथ मलिंगा(1/66) आणि दुश्मंथा चमिरा(1/43) यांनी विकेट्स घेतल्या.

अफगाणिस्तान, बांगलादेशचा पुढील फेरीतील प्रवेश पक्का-

अफगाणिस्तानने मिळवलेल्या या विजयामुळे त्यांचा आणि बांगलादेशचा पुढील फेरीतील प्रवेश पक्का झाला आहे. कारण श्रीलंका सलग दुसरा सामना हरला असून, याआधी त्यांना या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात बांगलादेशने पराभूत केले आहे.

त्यामुळे ब गटात बांगलादेश आणि अफगाणिस्ताच्या खात्यात सध्या प्रत्येकी एक विजय आहे. त्यामुळे त्यांचे पुढील फेरीचे दरवाजे उघडले गेले आहेत.

तसेच 5 वेळचा विजेता श्रीलंका मात्र यावर्षीच्या एशिया कप स्पर्धेमधून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

एशियन गेम्समधील सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्रा आणि जीन्सन जॉन्सन यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस

रोहित शर्मा एशिया कपमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करण्यास उत्सुक

रिषभ पंतच्या प्रशिक्षकाची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी शिफारस