तब्बल अठरा वर्षांनंतर हा संघ खेळणार रणजी ट्रॉफी

1 नोव्हेंबरपासुन सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये बिहार संघ तब्बल 18 वर्षांनंतर खेळणार आहे. भारतीय क्रिकेटपटू प्रग्यान ओझाची संघाचा कर्णधार म्हणुन निवड करण्यात आली आहे. तसेच बिहारचा पहिला सामना उत्तराखंड विरुद्ध असणार आहे.

“18 वर्षांनंतर बिहारचा संघ देशांतर्गत सामने खेळण्यास परतला आहे. विजय हजारे ट्रॉफीमधील संघाची कामगिरी विलक्षण ठरली आहे. रणजी ट्रॉफीमध्येही संघाने अशीच चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे”, असे ओझा म्हणाला.

विजय हजारे ट्रॉफीमध्ये बिहार उपांत्यपूर्व फेरीपर्यंत पोहचला होता. तेथे त्यांना श्रेयस अय्यर नेतृत्व करत असलेल्या मुंबई संघाकडून पराभूत व्हावे लागले होते. तसेच बिहार त्यांच्या गटात 30 गुणांसह अव्वल स्थानावर होता.

रणजी ट्रॉफीचे स्वरूप चार दिवसांचे तर विजय हजारे ट्रॉफीचे स्वरूप एक दिवसाचे असल्याने बिहारने संघात अनेक बदल केले आहेत.

बिहार संघातील केशव कुमार, बाबुल आणि समर कादरी हे खेळाडू विजय हजारे ट्रॉफीमध्ये यशस्वी ठरले होते. म्हणून त्यांचा समावेश रणजी ट्रॉफीसाठी पहिल्या अकरामध्ये करण्यात आला आहे.

रणजी ट्रॉफी 2018-19मध्ये बिहारचा पहिला सामना उत्तराखंड विरुद्ध 1 ते 4 नोव्हेंबर दरम्यान असणार आहे. तर दुसरा सामना पुद्दुचेरी विरुद्ध 20 ते 23 नोव्हेंबर दरम्यान असणार आहे.

पटनामधील क्रिकेट चाहत्यांसाठी ही स्पर्धा एक मोठी पर्वणीच असणार आहे. कारण नोव्हेंबर 28 ते डिसेंबर 1 दरम्यानचा सिक्कीम विरुद्धचा आणि डिसेंबर 6 ते 9चे अरूणाचल प्रदेश विरुद्धचा सामना पटनामध्ये होणार आहे.

यावर्षी रणजी ट्रॉफीमध्ये अ, ब, क आणि ड हे चार गट पाडले जाणार आहेत. ड गटात बिहार, उत्तराखंड आणि इशान्य भारतातील संघांचा समावेश असणार आहे.

2000मध्ये भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) बिहार क्रिकेट असोसिएशनला संपूर्ण सदस्यात्वातून काढले होते. त्यावेळी झारखंड हे नवीन राज्य निर्माण झाल्याने दोन वेगवेगळे क्रिकेट असोसिएशन तयार झाले.

मात्र यावर्षी जानेवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला बिहारला खेळण्याची परवाणगी देण्याचे आदेश दिले होते.

तसेच यावर्षी रणजी ट्रॉफीमध्ये पहिल्यांदाच 37 संघांचा समावेश असणार आहे. बिहार सोडता अरूणाचल प्रदेश, मनिपूर, मेघालय, मिझोरम, पुद्दुचेरी, सिक्कीम आणि उत्तराखंड हे संघ पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीमध्ये खेळणार आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू आणि बीसीसीआय तांत्रिक समितीचे अध्यक्ष असणाऱ्या सौरव गांगुलीच्या देखरेखीखाली बिहार आणि इशान्य भारतातील राज्यांचे रणजी ट्रॉफी 2018-19साठी समावेश करण्यात आला.

महत्त्वाच्या बातम्या:

टीम इंडियात सोडा युवराज आणि हरभजनला पंजाबच्या रणजी संघातूनही वगळले

वन-डेत रोहित सचिनइतकाच हिट.. जाणुन घ्या काय आहे कारण?