मोठा विक्रम: या खेळाडूने केल्या पदार्पणात २५६* धावा तर चौथ्याच सामन्यात नाबाद ३०३

अफगाणिस्तानच्या बहीर शाह या खेळाडूने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये असा काही कारनामा करून दाखवला आहे की जो दिग्गज खेळाडूंनाही करता आला नाही. १८ वर्षीय बहीर शाहने देशांतर्गत क्रिकेटमध्ये काल जबदस्त त्रिशतकी खेळी केली.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात त्रिशतकी खेळी करणारा तो दुसरा खेळाडू ठरला. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानचे माजी दिग्गज फलंदाज जावेद मियाँदाद यांच्या नावावर होता. त्यांनी १७व्या वर्षी त्रिशतकी खेळी केली होती.

या खेळाडूने त्याच्या पहिल्याच फर्स्ट क्लास सामन्यात नाबाद २५६ धावांची खेळी केली होती. त्यावेळी कमी वयात द्विशतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर झाला होता.

पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणारा बहीर शाह दुसरा खेळाडू आहे. मुंबईच्या अमोल मुझुमदारने पदार्पणात २६० धावा केल्या होत्या.

सध्या बहीर शाहच्या नावावर ४ सामन्यात २०७.७५ च्या सरासरीने ८३१ धावा आहेत. त्यात त्याने जी चार शतके केली आहेत त्यात १ त्रिशतक आणि एक द्विशतक आहे.