अडखळत सुरवातीनंतर ऑस्ट्रेलियाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल

आज १९ वर्षांखालील विश्वचषकाचा भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अडखळत झाली होती. परंतु त्यानंतर त्यांच्या फलंदाजांनी डाव सावरत मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करायला सुरुवात केली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांच्या सलामीवीरांनी लवकर बळी गमावले. मॅक्स ब्रायंट(१४) आणि जॅक एडवोर्ड(२८) या दोघांनाही वेगवान गोलंदाज ईशान पोरेलने बाद केले. त्यानंतर काही वेळातच कर्णधार जेसन संघालाही कमलेश नागरकोटीने १३ धावांवर पॅव्हेलियनचा रास्ता दाखवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था ३ बाद ५९ अशी झाली होती.

यानंतर मात्र जोनाथन मेर्लो आणि परम उपाल(३४) यांनी डाव सावरत ७५ धावांची भागिदारी रचली. जोनाथन अजूनही नाबाद खेळात असून त्याने त्याचे अर्धशतक पूर्ण केले आहे. उपाल बाद झाल्या नंतर नॅथन मॅक्स्विन्नीनेही(२३) जोनाथनला चांगली साथ दिली यामुळे ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत पोहोचली.

सध्या ऑस्ट्रेलियाने ४४ षटकात ६ बाद २०६ धावांवर खेळत असून जोनाथन मेर्लो आणि बॅक्सटर होल्ट नाबाद आहेत.