किदांबी श्रीकांतची हाँग काँग ओपनमधूनही माघार

भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने उद्या पासून सुरु होणाऱ्या हाँग काँग ओपन सुपर सेरीजमधून दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्याने या आधी मागील आठवड्यात पार पडलेल्या चायना ओपन सुपर सिरीज स्पर्धेतूनही माघार घेतली होती.

याबद्दल भारताचे फिजिओ सी किरण म्हणाले ” श्रीकांत आता बरा आहे. त्याची दुखापत आता बरी होत आली आहे. पण आम्हाला तो पुढची स्पर्धा खेळण्याआधी ९० टक्के बरा होण्यापेक्षा १०० टक्के बरा झालेला हवा आहे. म्हणून आम्ही त्याला अजून एका आठवड्याची विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला तो पूर्णपणे फिट हवा आहे.”

श्रीकांतनेही याबद्दल ट्विट केला आहे. तो ट्विटमध्ये म्हणाला, ” हाँग काँग ओपन स्पर्धेसाठी मी वेळेत बरा होऊ शकलो नाही त्यामुळे मी हाँग काँग ओपन स्पर्धेतून माघार घेत आहे. माझा वर्षातील शेवटची स्पर्धा- सुपर सिरीज फायनलपर्यंत पूर्णपणे बरा होण्याचा प्रयत्न असेल.”

१३ डिसेंबर पासून दुबईमध्ये सुपर सिरीज फायनल स्पर्धा होणार आहे.

जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या श्रीकांतला नागपूरमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती.

श्रीकांत बरोबरच भारताचे समीर वर्मा आणि अजय जयराम हे देखील हाँग काँग ओपन सुपर सिरीज स्पर्धेत दुखापतीमुळे खेळणार नाहीत. साई प्रणित मात्र चायना ओपन सुपर सिरीज मध्ये घेतलेल्या माघारीनंतर हाँग काँग ओपन सुपर सिरीजमध्ये खेळेल.