अंडर-१९ कूच बिहार चषक: विजेतेपदासह विदर्भाने रचला इतिहास

-अशुतोष मसगौंडे
नागपुर येथे काल पार पडलेल्या अंडर -१९ कूच बिहार चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विदर्भाने मध्यप्रदेशचा पराभव करत कूच बिहार चषक पहिल्यांदाच आपल्या नावे केला. यापूर्वी २०१७-२०१८ मोसमात विदर्भाच्या वरिष्ठ संघाने रणजीचे विजेतेपद मिळवत इतिहास रचला होता.

अंडर-१९ विदर्भ संघाने वरिष्ठ संघाच्या कामगिरीची पुनरावृती करत पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर कूच बिहार चषकाच्या अंतिम सामन्यात मध्यप्रदेशचा पराभव केला.

विदर्भाचा कर्णधार अथर्व तायडेने या विजयात मोलाची कामगिरी बजावली.अथर्वने ४८३ चेंडूत ३४ चौकार व एका षटकाराच्या मदतीने ३२० धावांची खेळी केली.अथर्वने या त्रिशतकाबरोबर कूच बिहार चषकात अशी कामगिरी करणार्‍या युवराज सिंगची बरोबरी केली. युवराज सिंगने १९९९-२००० च्या अंडर-१९ कूच बिहार चषकात त्रिशतक केले होते.

अथर्व तायडेच्या या खेळीच्या जोरावर मध्य प्रदेशच्या पहिल्या डावातील २८९ धावांचा पाठलाग करताना विदर्भाने ६१४ धावांचा डोंगर ऊभा केला. तर दुसर्‍या डावात सामन्याच्या अंतिम दिवशी मध्यप्रदेशचा डाव ७ बाद १७६ वर संपला व पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर विदर्भाने अंडर-१९ कूच बिहार चषकावर आपले नाव कोरले. विदर्भाकडून दर्शन नालकडेने पहिल्या डावात ४ गडी टिपले तर दुसर्‍या डावात पीआर रेखाडेने ४ गडी बाद केले.

हे विजेतेपद मिळवताना विदर्भाने लिग स्टेजमधे तीन विजयांसह दुसरे स्थान मिळवले तर उपांत्य पूर्व व उपांत्य सामन्यात अनुक्रमे कर्नाटक आणि पंजाबला पराभूत केले.