सलग दुसऱ्या दिवशी युवराज सिंगचा धमाका, पंजाबला मिळवून दिला दुसरा विजय

दिल्ली । कालच्या नाबाद ५० धावांच्या खेळीनंतर भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने आज पुन्हा मोठी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला आहे. सेनादल विरुद्ध खेळताना युवराजने आज ३५ चेंडूत ३५ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

सेनादलने नाणेफेक जिंकून या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सेनादलने निर्धारित २० षटकांत ९ बाद १४० धावा केल्या. त्यात अमित पचाराच्या ३५ धावा या सर्वोच्च होत्या.

उत्तरादाखल पंजाबकडून मनदीप सिंग आणि मनन व्होरा हे सलामीला आले. मनन व्होराला विशेष चमक दाखवता आली नाही. तो २ धावांवर बाद झाला तर त्यानंतर आलेल्या अनमोलप्रीत सिंगनेही १७ धावा करून तंबूचा रस्ता धरला. मात्र युवराज सिंग आणि मनदीप सिंग यांनी जास्त पडझड होऊ न देता संघाला विजय मिळवून दिला.

यात मनदीप सिंगने ५६ चेंडूत ८४ धावा केल्या तर सध्या राष्ट्रीय संघात परतण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या युवराज सिंगने ३५ चेंडूत ३५ धावा केल्या. यात त्याच्या २ षटकार आणि १ चौकराचा समावेश होता.