ISL 2018: गोव्यातील नाचक्कीनंतर मुंबईचा नव्याने प्रारंभाचा प्रयत्न

मुंबईहिरो इंडियन सुपर लीगमध्ये मुंबई सिटी एफसीला गोव्यात ०-५ अशा मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. आज (२७ ऑक्टोबर) मुंबई फुटबॉल एरिनावर मुंबईसमोर दिल्ली डायनॅमोज एफसी संघाचे आव्हान असेल. त्यावेळी गोव्यातील पराभव विसरून अनुकूल निकाल साधण्यासाठी नव्याने प्रारंभ करण्यासाठी जोर्गे कोस्टा यांचा मुंबई संघ प्रयत्नशील असेल.

मुंबईची एफसी गोवा संघाविरुद्ध सुरवात चांगली झाली होती. पारडे फिरविण्याची त्यांना संधी होती. नेटसमोर मात्र त्यांची कामगिरी धक्कादायक झाली. याचा फायदा घेत गोव्याने मुंबईला वेदनादायक पराभव पत्करण्यास भाग पाडले. हा पराभव कोस्टा यांच्या मनाला फार लागला आहे. केवळ निकालच नव्हे तर अखेरच्या टप्यात संघाने पत्करलेली शरणागती त्यांना हतप्रभ करणारी ठरली.

कोस्टा यांनी सांगितले की, “गोव्याविरुद्ध पहिले सत्र फार चांगले ठरले. मी सांगितलेली जवळपास प्रत्येक गोष्ट खेळाडूंनी केली. दुसऱ्या सत्रात पहिली वीस मिनिटे खराब नव्हती. त्यानंतर आम्ही प्रयत्न सोडून दिले. त्यामुळे मला दुःख होते. आम्ही ०-५ असे हरलो म्हणून नव्हे तर सामना कधी एकदा संपतो याची वाट बघत बसणारा संघ शेवटची १५ मिनिटे दिसला. आमचे खेळाडू धावत नव्हते. त्यांचे सामन्यावर लक्ष नव्हते. त्यांनी प्रयत्न सोडून दिले होते.”

पोर्तुगालच्या कोस्टा यांना स्कोअर कितीही असला तरी संघाने पहिल्यापासून शेवटपर्यंत संघर्ष करायला हवा असे वाटते.

ते पुढे म्हणाले की, “आम्ही आधी व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून आमच्या कराराचा आदर केला पाहिजे. दुसरा मुद्दा म्हणजे आम्ही  खेळाचा आदर केला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या चाहत्यांचा आदर करायला हवा. आम्ही प्रयत्न सोडून देऊ शकत नाही. शेवटच्या १५-१० मिनिटांत जे घडले त्याची मला लाज वाटते, याचे कारण खेळाडूंनी प्रयत्न सोडून दिले. व्यावसायिक फुटबॉलपटू असल्यावर तुम्ही अशी हार मानता कामा नये.”

संघातील निराशेचे वातावरण बदलण्यासाठी कोस्टा अनेक बदल करण्याची अपेक्षा आहे. कर्णधार ल्युचियन गोऐन याला जबाबदारी उचलावी लागेल आणि बचाव फळीतील उणीवा दूर कराव्या लागतील. त्याचवेळी त्याला ड्रेसिंग रुममधील खेळाडूंचे मनोधैर्य उंचावण्याची गरज असेल. मुंबईला मुख्य गोलरक्षक अमरिंदर सिंग याच्या गैरहजेरीत खेळावे लागेल. गोव्याविरुद्ध त्याला दुखापत झाली.

दुसरीकडे दिल्लीसमोर त्यांच्या स्वतःच्या अशा समस्या आहेत. हा संघ पहिल्या विजयाच्या शोधात आहे. तीन बरोबरी आणि एक पराभव अशी त्यांची आतापर्यंतची कामगिरी आहे. मुंबई सिटी संघाला गृहीत धरून त्यांना चालणार नाही.

दिल्लीचे सहाय्यक प्रशिक्षक मृदुल बॅनर्जी यांनी सांगितले की, “गोव्याचे सगळे गोल उत्तम होते. त्यामुळे हा निकाल गोव्याने साध्य केला. यात मुंबईला संधी मिळूनही त्याचे गोलमध्ये रुपांतर करता आले नाही. उद्या नवा सामना व नवा दिवस असेल. गोव्यातील निकालाचा मुंबईच्या कामगिरीवर परिणाम होईल असे वाटत नाही.”

दिल्लीने त्यांच्या सामन्यात बहुतांश प्रमाणावर अपेक्षाभंग केला आहे. बहुतेक सामन्यांत त्यांनी संधी निर्माण केल्या, पण धक्कादायक फिनीशिंगमुळे त्यांना परिणाम भोगावे लागले. त्यांच्या खात्यातील तीन गुण त्यांनी आतापर्यंत निर्माण केलेल्या संधींचे प्रमाण दर्शवित नाहीत.

बॅनर्जी यांनी पुढे सांगितले की, “आम्ही फार चांगला खेळ करीत आहोत. आम्ही अनेक संधी निर्माण केल्या आहेत, पण त्याचा फायदा उठवू शकलो नाही. हे टाळण्यासाठी आम्ही योग्य सराव करीत आहोत. एक किंवा दोन सामन्यांत आम्ही समस्यांवर मात्र करू असे वाटते.”

महत्तवाच्या बातम्या:

ISL 2018: चेन्नईयीनला हरवित एटीकेची चौथ्या क्रमांकावर झेप

Video: एकच ग्लोव्हज घालून फलंदाजीला आला हा फलंदाज; पुढे काय झाले ते पहाच

या कारणामुळे केदार जाधवला विंडीज विरुद्ध टीम इंडीयात मिळाले नाही स्थान