ब्लॉग: आता तरी संघ व्यवस्थापन अजिंक्य रहाणेवर विश्वास दाखवणार का?

-अजित बायस ([email protected])

“संघ निवड करताना आम्ही खेळाडूंच्या सध्याच्या फॉर्मचा विचार केला. आम्हाला विजयी संघासह सामन्यात उतरायचं होतं. रोहित गेल्या वर्षभरात तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये चांगल्या फॉर्ममध्ये आहे. दुर्दैवाने अजिंक्य रहाणेने गेल्या वर्षभरात फारशा धावा काढलेल्या नाहीत.”, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली केपटाऊन कसोटीत द.आफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर संघ निवडीबाबत उद्भवलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपल्या निर्णयांचा बचाव करताना बोलत होता.

रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या दोन्ही मुंबईकर खेळाडूंच्या गेल्या काही सामन्यातील कामगिरीवर नजर टाकली तर कोहलीच्या म्हणण्यात बरचसं तथ्य आहे असं आपल्याला वाटणं सहाजिकच आहे. कोहलीच्या बोलण्यात तथ्य असेल तर मग केपटाऊन कसोटीत झालेल्या पराभवाचे शवविच्छेदन करताना अजिंक्य रहाणेला संघात स्थान न देण्याची चूक भारतीय संघाला भोवली, रहाणेला अंतिम संघातून डावलल्यामुळेच भारताचा पराभव झाला, असे निष्कर्ष अनेक क्रिकेट तज्ञांनी काढले आहेत, ते कशाआधारे..? रहाणेचा आफ्रिका दौऱ्यावरील भारतीय संघात ‘प्लेयिंग इलेव्हन’मध्ये समावेश असणं खरंच इतकं महत्वाचं आहे का..? आणि या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी असेल तर ते का..?

भारतीय कसोटी संघासाठी, त्यातही प्रामुख्याने विदेशी भूमीवर खेळताना अजिंक्य रहाणेसारख्या गुणी खेळाडूला संघाबाहेर बसवणं खचितच व्यवहार्य ठरत नाही. हे समजावून घेण्यासाठी आपल्याला रहाणेच्या कसोटी कारकीर्दीवर एक नजर टाकावी लागेल. रहाणेने आत्तापर्यंत ४३ कसोटी सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलंय. या ४३ सामन्यातील ७३ इनिंग्जमध्ये ४४.१५ च्या सरासरीने काढलेल्या २८२६ धावा रहाणेच्या नावे जमा आहेत. त्यामध्ये ९ शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्याने शतक झळकावलेल्या ९ पैकी ५ सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवलाय तर ३ सामने अनिर्णीत राखण्यात भारताला यश मिळाले आहे. रहाणेने शतक झळकावलय आणि संघाला पराभव बघावा लागलाय असं आजपर्यंत सहसा झालं नाही.

भारतीय संघावर नेहमीच ‘घर के शेर’ असल्याची टीका केली जाते. त्यात बरचसं तथ्य देखील आहे. आपला संघ भारतीय उपखंडात चांगलाच खेळतो पण जेव्हा आपण भारतीय उपखंडाबाहेरील दौऱ्यावर असतो त्यावेळी मात्र संघाच्या मर्यादा स्पष्ट होतात. फलंदाजी असो कि गोलंदाजी आपण विरोधी संघासमोर सपशेल शरणागती पत्करल्याचे अनेक दाखले त्यासाठी दिले जातात.

रहाणेवर मात्र ही ‘घर का शेर’ टीकेची मात्रा लागू होत नाही. उलट विदेशातील हिरवळीचा गालीचा पांघरलेल्या आणि चेंडू उसळी घेणाऱ्या खेळपट्ट्यांवरच रहाणेची फलंदाजी अधिक बहरते. भारतीय उपखंडाबाहेरील त्याच्या आकडेवारीवर नजर टाकली असता आपल्याला ते पटकन लक्षात येतं. परदेशातील खेळपट्ट्यांवर रहाणेने आत्तापर्यंत २३ सामने खेळलेत त्यात त्याने १८१७ धावा स्वतःच्या नावे जमवल्यात. यादरम्यान त्याची सरासरी राहिलेली आहे तब्बल ५३.४४ इतकी. शिवाय त्याच्या कारकिर्दीतील ९ शतकांपैकी ६ शतके ही भारताबाहेरील खेळपट्ट्यांवर आहेत. परदेशी खेळपट्ट्यांवर भारतीय संघासाठी रहाणेची उपयुक्तता सांगण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी बोलकी आहे.

रहाणेने त्याचं पहिलंवहिल कसोटी शतक झळकावलं ते २०१४ च्या न्यूझीलंड दौऱ्यातील बेसिन रिझर्व्हच्या खेळपट्टीवर. तत्पूर्वी भारताने २०१३-२०१४ मध्ये जेव्हा आफ्रिकेचा दौरा केला होता त्यावेळी देखील राहाणेची कामगिरी चमकदार राहिली होती. चेतेश्वर पुजारा (२८०) आणि विराट कोहली (२७२) यांच्यानंतर भारताकडून २०९ धावांसह दौऱ्यात सर्वाधिक धावांच्या बाबतीत तो तिसऱ्या क्रमांकावर होता.

२०१४ च्या इंग्लंड दौऱ्यातील क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्डसवरील कसोटी तर भारतासाठी आणि रहाणेसाठीही ऐतिहासिक ठरली. या कसोटीत अपेक्षेप्रमाणे लॉर्डसची हिरवीगार खेळपट्टी भारतीय संघाच्या स्वागतासाठी सज्ज होती आणि अपेक्षेप्रमाणेच आपल्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांनी खेळपट्टीसमोर लोटांगण घातले होते. पहिल्या डावात भारत ७ बाद १४५ अशा बिकट परिस्थितीत सापडला होता. अशा स्थितीत रहाणे संघासाठी संकटमोचकाच्या भूमिकेत आला. तळाच्या खेळाडूंना हाताशी धरत त्याने भारताचा किल्ला समर्थपणे लढवला आणि भारताला २९५ ही सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. ही खेळी साकारताना त्याने ठोकलेल्या शतकाने लॉर्डसवरील आपल्या पहिल्याच कसोटीत शतक झळकावणारा सौरभ गांगुली नंतर तो दुसराच भारतीय क्रिकेटर बनला. पुढे पहिल्या डावातील पिछाडीनंतरही इशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने लॉर्डसवरील २८ वर्षाच्या कसोटी विजयाचा दुष्काळ संपवतांना इंग्लंडचा ९५ धावांनी पराभव केला. २०१४-१५ च्या गावस्कर-बॉर्डर ट्रॉफीतही ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यासमोर मेलबर्नवरील शतक आणि ३ अर्धशतकासह त्याने ३९९ धावा फटकावल्या.

एकंदरीत विचार केला तर आकडेवारी रहाणेच्या बाजूने भक्कमपणे उभी आहे. किंबहुना त्यामुळेच आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रहाणेला संघात समाविष्ट करण्यासंदर्भात संघ व्यवस्थापनावरचा दबाव वाढताना दिसतोय. कदाचित पुढच्या सामन्यात रहाणेला संधी दिली जाईलही पण तेवढ्याने प्रश्न सुटतो का..? संधी देऊनही पुढच्या सामन्यात जर तो अयशस्वी ठरला तर कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापन त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार का, हा ही प्रश्न आहेच.

कुठल्याही खेळाडूला सातत्यपूर्ण कामगिरी करण्यासाठी दोन गोष्टी अतिशय महत्वपूर्ण ठरतात, एक म्हणजे संघातील पक्के स्थान आणि दुसरं म्हणजे संघनायकाचा विश्वास. रहाणे दोन्ही गोष्टींच्या बाबतीत असुरक्षित असल्याचं कायमच जाणवत राहत. रोहित शर्माच्या, रोहीतपासून हिटमॅनपर्यंतच्या प्रवासात या बाबी अतिशय महत्वपूर्ण ठरल्या आहेत, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. रोहितच्या पाठीमागे धोनी जितक्या खंबीरपणे उभा राहिला तितकीच खंबीरता कर्णधार म्हणून विराट, रहाणेच्या बाबतीत दाखवेल का..? एक-दोन सामन्यातील खराब कामगिरीमुळे संघाचा उपकर्णधार असलेल्या खेळाडूला संघातून बाहेर बसविल्याने त्याच्या आत्मविश्वासावर या गोष्टीचा विपरीत परिणाम होत नाही का..? भविष्यकालीन संघ बांधणीच्या दृष्टीने ही गोष्ट कितपत योग्य आहे..?

जाता जाता भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने एका मुलाखतीत सांगितलेला एक किस्सा इथे सांगावासा वाटतो. २००१ च्या इडन गार्डन्सवरील कसोटी दरम्यानची ही गोष्ट. राहुल द्रविड त्यावेळी चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता, मागील काही सामन्यात त्याच्याकडून धावा झालेल्या नव्हत्या. कसोटीच्या पहिल्या डावातही त्याची कामगिरी जेमतेमच राहिली होती, आणि त्यामुळेच फोलोऑनची नामुष्की पत्करावी लागलेल्या संघाच्या दुसऱ्या डावात, नियमितपणे वन डाऊन फलंदाजीस येणाऱ्या राहुल द्रविडचा फलंदाजी क्रम बदलण्यात आला होता. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या द्रविडला डिवचण्याच्या उद्द्येशाने तत्कालीन ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह वॉ द्रविडला म्हणाला होता की, “ काय राहुल, सहाव्या क्रमांकावर ..? पुढच्या सामन्यात काय बाराव्या स्थानी का..? पुढच्या सामन्यात राखीव खेळाडू म्हणून खेळणार का?” असं विचारून स्टीव्ह, द्रविडचे मानसिक खच्चीकरण करू बघत होता.

पुढे लक्ष्मण-द्रविड जोडीने केलेला पराक्रम आणि भारताच्या ऐतिहासिक विजयाची अविस्मरणीय स्मृती मी इथे नव्याने सांगण्याची आवश्यकता आहे असं काही मला वाटत नाही. प्रत्येक भारतीय क्रिकेटरसिकाने ती जपलेली आहेच. हा किस्सा इथे अश्यासाठी सांगितला की, जरी अजिंक्य रहाणे हा राहुल द्रविड नसला आणि पहिल्या सामन्यात रहाणेला बाहेर बसविण्याच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त करणारा आफ्रिकन कर्णधार फाफ डू प्लेसीस हा ऑस्ट्रेलियन खेळाडूंप्रमाणे स्लेजिंगसाठी कुप्रसिद्ध नसला तरी ‘फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट’ असं रहानेच्या बाबतीत निश्चितच म्हटलं जाऊ शकतं. आणि रहाणेच्या ‘क्लास’ची साक्ष तर त्याचे टीकाकारही देतील.