केवळ २ वनडे सामने खेळला आणि झाला संघाचा कर्णधार

आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व २३ वर्षीय एडिन मार्करम हा खेळाडू करत आहे. मार्करम हा केवळ २ वनडे सामने खेळला असून त्यानंतर त्याकडे लगेच कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा सर्वात तरुण कर्णधार असून जगातील ११वा सर्वात तरुण वनडे कर्णधार आहे.त्याने आफ्रिकाकडून २ वनडे, ६ कसोटी सामने खेळले असून वनडेत ७५ तर कसोटीत ५२० धावा केल्या आहेत.  

दक्षिण आफ्रिकेकडून यापूर्वी क्लीव्ह राइस यांनी एकही सामना खेळाडू म्हणून न खेळता पहिल्याच सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते. परंतु तो दक्षिण आफ्रिकेचा इतिहासातील पहिलाच वनडे सामना होता.

त्यामुळे हा खास विक्रम आता २३ वर्षीय एडिन मार्करमच्या नावावर जमा झाला आहे. केप्लर वेस्सेल्स यांनी ३ सामने खेळल्यावर चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्व केले होते. ते ऑस्ट्रेलिया संघाकडूनही खेळले होते.

तर दक्षिण आफ्रिकेचा महान माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ हा २२ वनडे सामने खेळल्यावर दक्षिण आफ्रिकेचा वनडे कर्णधार झाला होता. ग्रॅमी स्मिथ २३ वर्ष आणि ३० दिवसांचा असताना आफ्रिकेचा वनडे कर्णधार झाला होता. 

एडिन मार्करमच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने २०१४मध्ये १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकला होता. दक्षिण आफ्रिकेने आजपर्यंतच्या इतिहासात हाच एकमेव विश्वचषक जिंकला आहे.

एडिन मार्करम दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील १९९१ पासूनचा १३वा कर्णधार ठरला आहे. डुप्लेसीने आजपर्यंत १३ वनडेत संघाचं नेतृत्व केलं असून त्यात संघाला ११ विजय मिळवून दिले आहे. तो दुखापतग्रस्त झाल्यामुळे मार्करमला प्रभारी कर्णधार करण्यात आले आहे.

कर्णधार कोहलीने जेव्हा २००८ला १९ वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकला होता तेव्हा एडिन मार्करम केवळ १३ वर्ष आणि ४ महिन्यांचा होता.