दुसरी कसोटी: एडन मार्करमचे शतक हुकले; दक्षिण आफ्रिकेला दुसरा झटका

सेन्चुरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर फलंदाज एडन मार्करमचे ६ धावांनी शतक हुकले आहे.

मार्करमला १५० चेंडूत ९४ धावांवर असताना आर अश्विनने सामन्याच्या ४७.३ षटकात झेलबाद केले. मार्करमचा झेल यष्टीरक्षक पार्थिव पटेलने घेतला. या आधी अश्विननेच दक्षिण आफ्रिकेचा पहिला बळी मिळवला होता. त्याने डीन एल्गारला ३१ धावांवर असताना बाद केले होते.

मार्करम आणि एल्गारने मिळून ८५ धावांची सलामी भागीदारी रचली होती. एल्गार बाद झाल्यावर मार्करमला हाशिम अमलाने चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली होती.

सध्या दक्षिण आफ्रिका ५१ षटकात २ बाद १६६ धावांवर खेळत आहे. हाशिम अमलाच्या साथीला एबी डिव्हिलियर्स खेळत आहे.