अजय ठाकूरने उलगडले प्रदीप नरवालच्या जबदस्त कामगिरीचे रहस्य

प्रो कबड्डीचा पाचवा मोसम आपल्या शेवटच्या लेगमध्ये आहे. प्ले ऑफमध्ये खेळणारे सर्व संघ निश्चित झाले आहेत. काही खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली तर काही खेळाडूंना कामगिरी करता आली नाही. प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाच्या सुरुवातीच्या काही सामन्यात तमिल थलाइवाजचा कर्णधार अजय ठाकूर रेडींगमध्ये उत्तम कामगिरी करण्यास कमी पडला होता.

पाचवा मोसम जेव्हा तमिलच्या घरच्या मैदानावर आला तेव्हा पासून अजय ठाकूरने दाखवून दिले की तो भारतातील सर्वात मोठा रेडर का आहे. त्याने सुरुवातीच्या काही सामन्यातील खराब कामगिरी करून देखील २२ सामन्यात २२२ गुण मिळवले आहेत. एका मोसमात २०० गुणांचा टप्पा पार करणारा तो केवळ दुसरा खेळाडू आहे.

पाचव्या मोसमात अजय ठाकुरपेक्षा जास्त गुण घेणारा खेळाडू फक्त प्रदीप नरवाल आहे. तमिल थलाइवाज विरुद्ध पटणा पायरेट्स सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अजय ठाकूरला प्रदीपच्या कामगिरी विषयी आणि तो बाकीच्या रेडरपेक्षा वरचढ का ठरतो आहे याबात विचारले असता तो म्हणाला, “तंदुरुस्त रहाणे प्रो कबड्डीमध्ये यश मिळवण्याची खूप महत्वाचे आहे.”

“प्रदीप हा तरुण खेळाडू आहे. त्याच्या खेळातील सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्याला तंदुरुस्तीच्या प्रश्नांनी घेरले नाही, तो कधी जायबंदी झाला नाही. त्यामुळे तो आपला नैसर्गिक खेळ करतो आहे आणि गुण मिळवतो आहे. जर तुम्ही त्याची तुलना काही मोठ्या खेळाडूंसोबत कराल तर तुमच्या असे लक्षात येईल की प्रदीपला त्यांच्यापेक्षा खूप कमी दुखापतीला सामोरे जावे लागले आहे. तुम्ही जर दुखापतीतून तंदुरुस्त होऊन आला असाल तर तुम्ही अगोदर सारखे खेळाडू नसता, तुम्ही खेळावरचे लक्ष थोडे कमी झालेले असते.”