दुबई मास्टर कबड्डी स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व या खेळाडूकडे

दुबई | या महिन्यात दुबईत होणाऱ्या दुबई मास्टर कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा अजय ठाकूरकडे सोपविण्यात आली आहे.

काही दिवसांपुर्वी या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात  आली होती. २३ ते २६ नोव्हेंबर या काळात गोरगन, इराण येथे  एशियन कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धेतही त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. तेव्हा त्याने भारतीय संघाला विजय मिळवुन दिला होता.

दुबई मास्टर कबड्डी स्पर्धा २२ ते ३० जून या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत भारतासह पाकिस्तान, इराण, श्रीलंका, इंडोनेशिया, जपान, कोरिया या देशांचे संघ सहभागी होणार आहेत.

या स्पर्धेकडे एशियन्स गेम्सची रंगीत तालिम म्हणुन पाहिले जात आहे. ३२ वर्षीय अजय हा संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. फर्स्ट रेडर म्हणुन या स्टार खेळाडूकडे पाहिले जाते.

प्रो-कबड्डीमध्ये ८० सामन्यात त्याने ५२९ गुण रेडिंगमध्ये कमावले आहे. २०१६ साली झालेल्या विश्वचषक विजेत्या संघाचा तो भाग होता.

याशिवाय या संघात रिशांक देवाडिगा आणि गिरीश इरनाक या महाराष्ट्रीयन खेळाडूंचाही समावेश आहे.

असा असेल भारताचा राष्ट्रीय कबड्डी संघ –

अजय ठाकूर (कर्णधार), गिरीश इरनाक, सुरिंदर नाडा, मोहित चिल्लर, राजु लाल चौधरी, सुरजित नरवाल, प्रदीप नरवाल, राहुल चौधरी, रिशांक देवाडीगा, मोनू गोयत, रोहित कुमार, मनजीत चिल्लर, संदीप नरवाल, दिपक निवास हुडा

राखीव खेळाडू – मणिंदर सिंह, सचिन तंवर