बॅडमिंटन : नाशिककर अजिंक्य पाथरकरची भारतीय संघात निवड एशियन ज्युनिअर लीगसाठी आज होणार रवाना

नाशिक : नाशिकचा उगवता तारा बॅडमिंटनपटू अजिंक्य पाथरकर याची जकार्ता (इंडोनेशिया) येथे होणाऱ्या एशियन ज्युनिअर लीगसाठी भारतीय संघात निवड झाली आहे.
बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने या स्पर्धेसाठी निवड चाचणी स्वरुपात चंडीगड (18 ते 23 सप्टेंबर) आणि पंचकुला (25 ते 30 सप्टेंबर) येथे घेतलेल्या ऑल इंडिया ज्युनिअर रँकिंग टूर्नामेंट स्पर्धांत १९ वर्षाखालील गटात दुहेरीत अजिंक्यने त्याचा सहकारी अक्षण शेट्टी याच्या सोबत उपांत्यफेरी पर्यंत अर्थात अंतिम आठ खेळाडूंत मजल मारली होती. या कामगिरीच्या बळावर अजिंक्यची जकार्ता (इंडोनेशिया) येथे 16 ते 21 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या एशियन ज्युनिअर लीगसाठी भारतीय संघात वर्णी लागली.
भारतीय संघ जकार्ता साठी नवी दिल्ली येथून शनिवारी (दि. 13) रवाना होत असून त्यासाठी अजिक्य नाशिकहून रवाना झाला आहे. या स्पर्धेत चीन, जपान, कोरिया, इंडोनेशिया, मलेशिया आणि इतर देशातील खेळाडू सहभागी होणार आहेत.
अजिंक्यची आजपर्यंतची कामगिरी भरीव राहिली आहे. त्याने 2016/17 साली नवीदिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेचे विजेतेपद मिळवले आहे. तसेच ठाणे आणि नांदेड येथे झालेल्या 19 वर्षाखालील स्पर्धांचेही विजेतेपदावर त्याने नाव कोरले आहे. वेस्ट झोन इंटर स्टेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2018 साठीदेखील अजिंक्यची महाराष्ट्राच्या संघात निवड, तेथे दुहेरीत विजय अशी यावर्षीची अजिंक्यची कामगिरी राहिली आहे. अजिंक्यच्या नावे आजवर 10 राज्य स्तरीय मेडल्स तर 1 राष्ट्रीय स्तरावरील पदक तसेच 2 शालेय स्तरावरील मेडल्स अशी कमाई आहे.
या दोनही आंतरराष्ट्रीय स्पर्धा झाल्यानंतर लखनऊ येथे होऊ घातलेल्या ऑल इंडिया चॅम्पियनशीप स्पर्धेसाठीही अजिंक्य पाथरकरची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
अजिंक्यचे वडील राजेश पाथरकर हे देखील उत्तम बॅडमिंटनपटू असून त्यांचे मार्गदर्शन त्यास लाभते. अजिंक्य सध्या व्ही. एन. नाईक संस्थेत पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. या उतुंग कामगिरीसाठी संस्थेचे सहचिटणीस तानाजी जायभावे, हेमंत धात्रक, प्रभाकर धात्रक, बंगाल सर (प्रिन्सिपल), डॉ. कैलास चंद्रधर (प्रिन्सिपल लोकेननेते गोपीनाथ मुंढे इंस्टिट्यूट ऑफ़ इंजिनियरिंग एज्युकेशन एन रिसर्च) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.