नाशिककर अजिंक्य पाथरकरचे ठाणे महापौर चषक बॅडमिंटन स्पर्धेत यश

नाशिक: नाशिककर अजिंक्य पाथरकर या आघाडीच्या बॅडमिंटनपटूने ठाणे महापौर चषक स्पर्धे अंतर्गत झालेल्या महाराष्ट्र राज्य खुल्या आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत 19 वर्षालालील गटात यश मिळविले आहे. दुहेरीतील अंतिम सामन्यात अजिंक्यने नागपूरच्या गौरव मिठे याच्या साथीने खेळताना मुंबईच्या अक्षण शेट्टी आणि विख्यात बांगेरा या जोडीचा 22-20, 17-21, 26-24 असा पराभव करत विजेतेपद पटकावले आहे.

व्ही. एन. नाईक संस्थेच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेला अजिंक्य आणि नागपूरकर गौरव यांनी अत्यंत संयमी खेळ केला. पहिल्या सेट मध्ये मोठी आघाडी घेतल्यानंतर मुंबईकर आक्षण-विख्यात जोडीने प्रतिकार केला मात्र त्यांना यश मिळाले नाही. दुसरा सेट मॅच पॉईंटवर मुंबईच्या जोडीने जिंकला.

अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या अंतिम सामन्यात विजेतेपद मिळवण्यासाठी अजिंक्य आणि गौरवला संयमी खेळ करण्याचा फायदा झाला. सुरुवातीला बरोबरीत सामना चालल्यानंतर मुंबईच्या जोडीने दबाव आणि मानसिक ताण येऊन सर्व्हिस करताना केलेल्या चुका मुंबईच्या जोडीला भोवल्या आणि सुमारे 9 मॅच पॉईंट पर्यंत रंगलेल्या या अंतिम सेट सेटमध्ये अक्षण-विख्यात जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. दोन्ही बाजूने अवघड स्मॅशेज, ड्राइव्ह शॉट असे विविध फटके बघण्याची पर्वणी उपस्थितांना बघावयास मिळाली.

त्याचबरोबर वेदांत काळे आणि शंतनू पवार या नाशिककर जोडीने 17 वर्षांखालील गटात आयुष खांडेकर आणि पार्थ घुगे या जोडीचा अंतिम सामन्याला साजेशा झालेल्या लढतीत 21-17, 22-24, 21-14 असा पराभव करत विजेतेपद पटकावले.

ठाण्याचे महापौर मीनाक्षी शिंदे आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लखाणी यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

आधीच्या स्पर्धा आणि या स्पर्धेतील उत्तम कामगिरीच्या बळावर अजिंक्य पाथरकरने महाराष्ट्राच्या संघात निवड होण्यासाठीचे गुण प्राप्त केले असून यामुळे त्याचे महाराष्ट्र संघातील स्थान पक्के होण्यासह लखनऊ येथे होणाऱ्या अखिल भारतीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप साठी पश्चिम विभागातर्फे महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्यासाठी अजिंक्यची निवडही जवळपास निश्चित आहे. अजिंक्य व्ही. एन. नाईक संस्थेच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयातून शिक्षण घेत आहे.