पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून अजिंक्य रहाणेला खास पत्र !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेला एक पत्र लिहून स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्याची विनंती केली आहे. या पत्रात त्यांनी अजिंक्य रहाणेला महात्मा गांधींच्या जयंती निमित्त घेण्यात येणाऱ्या “स्वछ ही सेवा हैं” या कार्यक्रमात सहभागी होण्यास आमंत्रित केले आहे. ऑक्टोबर महिन्यात २ तारखेला भारताचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणाऱ्या महात्मा गांधींची जयंती असते. त्या दिवशी भारतात स्वच्छ भारत दिवस साजरा केला जातो.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५वा आणि शेवटचा वनडे सामना नागपूर येथे आहे. त्यानंतर भारतीय संघ रांची येथे टी२० सामन्यासाठी रवाना होणार आहे. या मधल्या काळात भारतीय संघाला ६ दिवसांचा वेळ मिळणार आहे. त्यामुळे अजिंक्य पंतप्रधानांच्या या हाकेला कसा प्रतिसाद देतोय हे लवकरच कळेल.

यापूर्वी युवराज सिंगलाही पंतप्रधान मोदी यांनी पात्र लिहून कौतुक केले होते. कॅन्सरग्रस्तांसाठी करत असलेल्या कामासाठी मोदींनी या खेळाडूचे खास कौतुक केले होते. गेल्या एक महिन्यात आपण केलेल्या कामासाठी मोदींकडून पत्र मिळालेला तो दुसरा क्रिकेटपटू आहे.

यदाकदाचित आपल्याला माहित नसेल तर-

अजिंक्य रहाणे सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु असलेल्या मालिकेत चांगली कामगिरी करत असून त्याने कोलकाता वनडेत अर्धशतकी खेळी केली. गेल्या ८ सामन्यात अजिंक्य रहाणेने ५ अर्धशतकी खेळी केल्या असून त्याला सध्या सलामीला भारतीय संघाकडून खेळायला मिळत आहे. अजिंक्य रहाणेने ८१ वनडे सामन्यात ३४.२५च्या सरासरीने २६३८ धावा केल्या आहेत.