खास रिपोर्ट: चौथ्या क्रमांकासाठी अजिंक्य रहाणेच सर्वात उत्तम पर्याय !

भारतीय संघ हा वनडेमध्ये आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे. २०१५ च्या विश्वचषक उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या हार नंतर भारताने वनडेमध्ये ४७ सामन्यात ३० विजय मिळवले आहेत. १० वनडे मालिकांपैकी फक्त ३ मालिका भारताने हरल्या आहेत. एवढेच नाही तर २०१७च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधेही भारताने अंतिम सामना खेळला होता.

भारताच्या विजयामागे प्रमुख कारण आहे, भारताची उभारती गोलंदाजी. जसप्रीत बुमराच्या पदार्पणानंतर भारताच्या गोलंदाजीच्या दर्जात कमालीचा बदल आला आहे. त्याचबरोबर बुमरा आणि भुवनेश्वर कुमारने जय वीरूची जोडी बनून समोरच्या संघाच्या फलंदाजांवर तुटून पडत आहेत.

वेगवान गोलंदाजी बरोबरच भारताकडे रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजासारखे अनुभवी फिरकी गोलंदाज आहेत तर कुलदीप यादव आणि यज्वेंद्र चहल सारखे रिस्ट स्पिंनर्सही आहेत.

भारताचे सलामीवीर आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस येणाऱ्या फलंदाजांबद्दल तर काही बोलायलाच नको. विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन या तिघांनी मिळून भारताच्या संपूर्ण स्कॉरच्या ६० % धावा केल्या आहेत. २०१५ पासूनच्या ४७ वनडे सामन्यात भारताच्या पहिल्या तीन फलंदाजांनी ६,९५० धावा केल्या आहेत. या कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघाच्या पहिल्या ३ फलंदाजांपेक्षा जास्त आहेत.

वेगवान गोलंदाजांची उत्तम कामगिरी, फिरकी गोलंदाजांमध्ये असलेले मुबलक पर्याय, सलामीवीर फलंदाज आणि विराट कोहली यांचे सातत्य या सर्व सकारात्मक गोष्टी जरी भारतीय संघाच्या बाबतीत घडत असल्या तरी एक महत्वाची गोष्ट संघाबद्दलची खटकते ती म्हणजे ज्यामुळे या संघाला आपण २०१९च्या इंग्लंडमधील विश्वचषकाचे प्रबळ दावेदार म्हणून शकत नाही.

भारतीय संघात चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार ?

चौथ्या क्रमांकावरीलफलंदाज ही भारतीय संघातील एक मोठी कमकुवत बाजू आहे. समजा भारतीय संघ प्रथम फलंदाज करत आहे आणि सलामीवीर फलंदाजांबरोबरच विराट कोहली खराब फटका मारून बाद झाला तर भारताकडे मधल्या फळीत धोनी शिवाय एकही अनुभवी खेळाडू, जो की भारताला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेऊ शकतो आणि त्यातून जर भारत धावांचा पाठलाग करत असेल तर मग काही विचारायलाच नको. २०१७च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामान्यमध्ये पाकिस्तानने भारताच्या पहिल्या ३ विकेट्स घेतल्यानंतर संपूर्ण मधल्या फळीने नांगी टाकली. मधल्या फळीतील अनुभवहीनता तेव्हा दिसून आली. २०१५ नंतर भारताच्या ४७ सामन्यानंतर ४ ते ११ क्रमांकाच्या फलंदाजांनी फक्त ४७९८ धावा केल्या आहेत. भारताच्या ४ ते ७ क्रमांकावरील फलंदाजांनी २९०५ धावा केल्या आहेत. ४ते ७ या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक धाव करणाऱ्या देशांच्या यादीत भारत ५व्या क्रमांकावर आहे.

एमएस धोनी

युवराज सिंग फिटनेसमुळे जेव्हा संघाबाहेर गेला तेव्हा ही चौथ्या क्रमांकाची सर्कस चालू झाली. यामध्ये प्रथम भारताच्या माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला संधी देण्यात आली. धोनीने त्याही क्रमांकावर धोनीने चांगला खेळ केला. पण त्यामुळे खालच्या फळीतील कमी अनुभवी फलंदाजांना झटपट धावा करणे अवघड जाऊ लागले. त्यामुळे धोनी पुन्हा ६व्या क्रमांकावर फलंदाजी करू लागला.

हार्दिक पंड्या

भारताच्या या स्टार अष्टपैलू खेळाडुनेही चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण पंड्यासारखा पहिल्या चेंडूपासून फटके मारू शकणाऱ्या फलंदाजाला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवणे चुकीचे आहे असे मत अनेक क्रिकेट पंडितांनी मांडले. त्याच बरोबर त्याचीही कामगिरी या क्रमांकावर एवढी काही खास राहिली नाही.

मनीष पांडे

त्यानंतर अनेक क्रिकेट पंडितांच्या मते भारतासाठी चौथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी सर्वाधिक पात्र असलेल्या मनीष पांडेकडे भारतीय संघ वळला. त्यानेही ८ सामन्यात १८३ धावा केल्या. त्याची सरासरी ३६ची होती. पण जेव्हा मनीष या जागेसाठी रुळायला लागला तेव्हाच भारतीय संघ व्यवस्थापनाने त्याच्याकडे पाठ फिरवली.

त्यानंतर भारताने दिनेश कार्तिक, के एल राहुल, मनोज तिवारी, केदार जाधव अगदी विराट कोहलीही या जागेवर खेळला. पण अजूनही चोथ्या क्रमांकावर खेळण्यासाठी एकही फलंदाजने तगडी दावेदारी पेश केली नाही.

हा खेळाडू आहे चौथ्या क्रमांकासाठी सर्वोत्तम फलंदाज !

भारताच्या कर्णधार विराट कोहलीने जरी स्पष्ट शब्दात हे सांगितलेले असले की अजिंक्य राहणे हा संघात पर्यायी सलामीवीर म्हणूनच खेळेल तरी जर भारताला हा मधल्या फळीतील अनुभवाचा आणि कामगिरीचा प्रश्न सोडवायचा असेल तर भारताला अजिंक्य राहणे शिवाय पर्याय नाही.

भारतासाठी हा प्रतिभावान फलंदाज कसोटीमध्ये ५व्या क्रमांकावर फलंदाजी करतो. २०१५च्या विश्वचषकापासून भारतासाठी अजिंक्य रहाणेने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना धोनी आणि युवराजनंतर सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याची सरासरी भारतासाठी नंबर ४ वर खेळलेल्या सर्व १० खेळाडूंपेक्षा जास्त आहे.

रहाणेने ५ सामन्यात ५६ च्या सरासरीने २८० धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेटही १०३ चा आहे. त्यामुळे तो अति हळू खेळतो हा त्याच्यावर असलेला आरोपही तो या कामगिरीतून चुकीचा ठरतो.

आता भारतापुढे २ पर्याय आहेत

एक म्हणजे भारत २०१९ पर्यंत अजिंक्य रहाणेला संधी देऊन त्याला या क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार करू शकतो. यात एक रिस्क आहे ती म्हणजे जर राहणेपुढे पहिल्या चेंडूपासून फटकेबाजी करण्याची परिस्थती आली तर तो ते करू शकले का? पण २०१९पर्यंत संघ व्य्वस्थान रहाणेला अश्या परिस्थतीसाठी तयार करू शकतो.

दुसरा पर्याय म्हणजे दुसरा प्रतिभावान खेळाडू मनीष पांडेला २०१९ पर्यंत संधी देऊन त्याला या क्रमांकावर तयार करू शकतो. मनीष पांडे हा असा खेळाडू आहे जो गरज पडली तर सांभाळून खेळू शकतो तर पहिल्या चेंडूपासूनच फटकेबाजी ही करू शकतो.