म्हणून रहाणे खेळणार रणजी ट्रॉफी स्पर्धेत

मुंबई । मुंबईकर अजिंक्य रहाणेचा ओडिसा संघाविरुद्ध भुवनेश्वर येथे होणाऱ्या मुंबईच्या रणजी संघात समावेश करण्यात आला आहे. रहाणेबरोबरच मुंबईकर शार्दूल ठाकूरचाही या संघात समावेश करण्यात आला आहे.

हा सामना १ ते ४ नोव्हेंबर रोजी भुवनेश्वर येथे होणार आहे.

सध्या भारतीय संघात न्यूजीलँड विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी दोघांचाही संघात समावेश करण्यात आला आहे परंतु दोघांनाही पहिल्या दोन वनडेत संधी देण्यात आली नाही.

शिवाय हे दोन खेळाडू न्यूजीलँड विरुद्ध होणाऱ्या टी२० मालिकेसाठीही संघात स्थान मिळवू शकले नाही. त्याचमुळे देशातील प्रतिष्ठेच्या रणजी स्पर्धेसाठी आपण उपलब्ध असल्याचं त्यांनी कळवलं आहे.

रहाणेने यापूर्वी राष्ट्रीय संघात समावेश नसतानाही रणजी स्पर्धेसाठी उपलब्ध नसल्याचं कळवलं होत. तेव्हा तो सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी परदेशात गेला होता. त्यामुळे अजित आगरकर प्रमुख असलेल्या मुंबई रणजी संघाची निवड समिती रहाणेवर नाराज होती. रहाणे त्यामुळे रणजी स्पर्धेतील पहिले दोन सामनेही खेळू शकला नव्हता.

न्यूजीलँड विरुद्ध टी२० स्पर्धेसाठी संघात स्थान दिल्यामुळे श्रेयस अय्यर रणजी सामन्यासाठी उपलब्ध नसणार आहे. रहाणेनेला संघात श्रेयसच्याच जागी संधी देण्यात आली आहे.

मुंबई संघ: आदित्य तारे (कर्णधार आणि यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, अखिल हेरवाडकर, पृथ्वी शॉ, जय बिस्ट, अजिंक्य रहाणे, सिद्देश लाड, अभिषेक नायर, विजय गोहिल, धवल कुलकर्णी, आकाश पारकर, रॉयस्टोन डायस, शार्दूल ठाकूर, तुषार देशपांडे, आदित्य धुमाळ, सुफियान शेख