जबदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रहाणेला खुणावतोय हा खास विक्रम

सेंच्युरियन। दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात आज दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेला एक खास विक्रम करण्याची संधी आहे.

त्याला वनडे कारकिर्दीत ३००० धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी फक्त ९९ धावांची गरज आहे. त्याने आत्तापर्यंत ८५ वनडे सामन्यात खेळताना ३५. ८१ च्या सरासरीने २९०१ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ३ शतकांचा आणि २४ अर्धशतकांचा समावेश आहे.

रहाणेने जर ३००० धावा पूर्ण केल्या तर तो हा टप्पा गाठणारा २० वा भारतीय फलंदाज ठरणार आहे. त्यामुळे राहणेसाठी ही मोठी संधी आहे.

रहाणे सध्या चांगल्या फॉर्ममध्ये खेळत आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या वनडेत खेळताना कर्णधार विराट कोहलीला भक्कम साथ दिली होती. त्याने या सामन्यात ८६ चेंडूत ७९ धावा केल्या होत्या. तसेच विराटने शतक केले होते. या दोघांच्या खेळीच्या जोरावर भारताने या सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवत ६ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

रहाणेला मागील काही सामन्यांमध्ये संघात स्थान मिळवण्यासाठी झगडावे लागले होते. पण त्याने जेव्हा संघात खेळण्याची संधी मिळाली तेव्हा त्याने सोने केले आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या कसोटीत खेळण्याची संधी मिळाली होती. या सामन्यात त्याने त्याच्या संयमी खेळीचे चांगले प्रदर्शन केले होते. तसेच पहिल्या वनडे सामन्यातही त्याने अर्धशतक करून त्याची जागा पक्की केली आहे.