काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पणातच अजिंक्य रहाणेची शतकी खेळी, पहा व्हिडिओ

भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने बुधवारी(22 मे) काउंटी क्रिकेटमध्ये हॅम्पशायरकडून खेळताना नॉटींगहॅमशायर विरुद्ध शतकी खेळी केली. रहाणेने या सामन्यातून काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.

त्यामुळे तो काउंटी क्रिकेटमध्ये पदार्पणाच्या सामन्यातच शतक करणारा तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी पियूष चावलाने ससेक्स संघाकडून तर मुरली विजयने एसेक्स संघाकडून काउंटी क्रिकेटमध्ये पदापर्णाच्या सामन्यात शतक केले होते.

हॅम्पशायर विरुद्ध नॉटिंगहॅमशायर संघात 20 मेपासून हा सामना सुरु झाला आहे. या सामन्यात हॅम्पशायरने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्वबाद 310 धावा केल्या. या डावात रहाणेला 10 धावाच करण्यात यश आले.

त्यानंतर नॉटिंगहॅमशायरने पहिल्या डावात सर्वबाद 239 धावा केल्या. यामध्ये त्यांचा कर्णधार स्टीव्हन मुलानीने 102 धावांची शतकी खेळी केली. मात्र तरीही त्यांना 71 धावांची पिछाडी मिळाली.

दुसऱ्या डावात हॅम्पशायरचे जो वेदरली आणि ऑलिव्हर सोअम्स ही सलामीची जोडी लवकर बाद झाली. पण त्यानंतर मात्र रहाणे आणि सॅम नॉर्थइस्टने तिसऱ्या विकेटसाठी 257 धावांची भागीदारी करत डाव सावरला. या दोघांनीही या डावात शतकी खेळी केली.

रहाणेने 197 चेंडूत 119 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 14 चौकार मारले. तर हॅम्पशायरचा कर्णधार नॉर्थइस्टने 186 चेंडूत 133 धावांची खेळी केली. या दोघांची जोडी अखेर मॅथ्यू कार्टकने 70 व्या षटकात रहाणेला त्रिफळाचीत करत तोडली. त्यानंतर काही वेळातच नॉर्थइस्टही बाद झाला.

रहाणेने या डावात 63 व्या षटकात कार्टरच्या गोलंदाजीवरच कव्हर ड्राइव्हचा फटका मारत काउंटी क्रिकेटमधील पहिले शतक साजरे केले होते. रहाणेचे हे प्रथम श्रेणीमधील 30 वे शतक ठरले आहे.

या सामन्यात हॅम्पशायरने दुसरा डाव 5 बाद 367 धावांवर घोषित केला आणि नॉटींगहॅमशायरला 439 धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना नॉटींगहॅमशायरने तिसऱ्या दिवसाखेर दुसऱ्या डावात 2 बाद 42 धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.