आगरकरची धोनीवर टीका म्हणजे आमदाराने पंतप्रधानावर टीका केल्यासारखं आहे !

पुणे । ४ नोव्हेंबर रोजी राजकोट येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू न शकलेल्या एमएस धोनीला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. चाहते, माजी खेळाडू, माजी कर्णधार यांनी धोनीवर सडकून टीका केली.

त्याचवेळी अनेक माजी खेळाडू आणि कर्णधार विराट कोहलीने मात्र धोनीचे जोरदार समर्थन केले. धोनीवर टीका करणाऱ्या मुंबई निवड समितीच्या प्रमुखपदी असणाऱ्या माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरला मात्र धोनीच्या चाहत्यांच्या जोरदार रोषाला सामोरे जावे लागले.

अनेक धोनीप्रेमींनी ट्विटर तसेच सोशल माध्यमांवर आगरकरवर सडकून टीका केली तसेच ट्रोलही केले.

त्यातील काही ट्विटमध्ये ज्यांनी देशासाठी काही केले नाही ते धोनीला वगळण्याची गोष्ट करतात, एक लोकल आमदार पंत्रप्रधानावर टीका करतोय, आगरकर तू धोनीवर टीका करायला पात्र तरी आहेस का? तुला काही काम नाहीत आणि तुला प्रसिद्धी हवी आहे, तू शांत बस, तुला धोनीवर टीका करायचा काही हक्क नाही अशी आगरकरवर टीका करण्यात आली.