अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील)टेनिस स्पर्धेत महाराष्ट्रच्या आकांक्षा नित्तुरे, गुजरातच्या मोहित बोन्द्रे यांना विजेतेपद

पुणे: ओम दळवी मेमोरियल ट्रस्ट यांच्या तर्फे आयोजित व एआयटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या दहाव्या ओम दळवी मेमोरियल मायक्रो इंडिया करंडक अखिल भारतीय मानांकन सुपर सिरीज(18 वर्षाखालील) टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात आकांक्षा नित्तुरे हिने, तर मुलांच्या गटात मोहित बोन्द्रे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

महाराष्ट्र पोलिस(एमटी जिमखाना)टेनिस जिमखाना,परिहार चौक, औध येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलांच्या एकेरी गटात अंतिम फेरीत गुजरातच्या बिगरमानांकित मोहित बोन्द्रेने महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकीत आर्यन भाटियाचा 2-6, 6-1, 6-1 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद पटकावले. हा सामना 2तास चालला. मोहित हा अहमदाबादमध्ये एसएमटी पीबीडी जोशी हायस्कुल येथे 11वी इयत्तेत वाणिज्य शाखेत शिकत असून खोकरा टेनिस अकादमी येथे प्रशिक्षक जिग्नेश वाघेला यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो. याआधी त्याने अहमदाबाद येथील चॅम्पियन सिरिज टेनिस स्पर्धेत 18वर्षाखालील गटाचे विजेतेपद पटकावले होते.

मुलींच्या गटात अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या आकांक्षा नित्तुरेने चौथ्या मानांकित गार्गी पवारचा 6-1, 7-5 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. हा सामना 1 तास 50 मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये आकांक्षाने वर्चस्व राखत गार्गीने पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस रोखली. त्यानंतर आकांक्षाने गार्गीची सातव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-1अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये गार्गीने जोरदार खेळ करत आकांक्षाची पाचव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत 3-3अशी बरोबरी साधली. त्यानंतर सामन्यात 5-4अशा फरकाने गार्गी आघाडीवर असताना आकांक्षाने  तिची 10 व 12व्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 7-5असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले. आकांक्षा नित्तुरे हि न्यू होरायजन शाळेत 10वी इयत्तेत शिकत असून एनएमएसए टेनिस अकादमी येथे अल्पेश गायकवाड, अरुण भोसले शेखर टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.

स्पर्धेतील एकेरी गटांतील विजेत्या खेळाडूला करंडक व 50एआयटीए गुण, तर उपविजेत्या खेळाडूंना करंडक व 40एआयटीए गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे ट्रस्टी विक्रम बोके, मायक्रो इंडियाचे संचालक राजेश पवार आणि सुंदरराजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ओम दळवी मेमोरियल ट्रस्टचे उमेश दळवी, आयटीएफ व्हाईट बॅच रेफ्री संतोष वेंकटरमण आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:अंतिम फेरी: मुले:
मोहित बोन्द्रे(गुजरात)वि.वि.आर्यन भाटिया(महा)(4)2-6, 6-1, 6-1;

अंतिम फेरी: मुली:
आकांक्षा नित्तुरे(महाराष्ट्र) वि.वि.गार्गी पवार(महाराष्ट्र)(4) 6-1, 7-5.