महिला विश्वचषक: अक्षय कुमारने मागितली देशवासीयांची माफी!

बॉलीवूड सुपरस्टार अक्षय कुमारने देशवासीयांची माफी मागितली आहे. काल भारत विरुद्ध इंग्लंड या महिला विश्वचषक अंतिम फेरीच्या वेळी अक्षय कुमार भारतीय संघाला पाठिंबा देण्यासाठी लॉर्ड्स मैदानावर उपस्थित होता.

सामना सुरु होण्यापूर्वी अक्षय कुमारने एक खास विडिओ शेअर करून सामना पाहायला जात असून भारतीय संघाला पाठिंबा देणार आहे असे सांगितले होते. त्यानंतर सामना सुरु असताना अक्षय मैदानात होता. त्यावेळी भारताचा राष्ट्रध्वज हातात घेऊन अक्षयने एक फोटो शेअर केला.

यात अक्षयने भारतीय राष्ट्रध्वज हिरव्या रंगाच्या बाजूने पकडला असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे अक्षय कुमारवर मोठ्या प्रमाणात सर्वच स्थरातून टीका होत आहे .

अक्षय कुमारने आज सकाळी तो ट्विट तात्काळ डिलिट करून दुसऱ्या ट्विटमधून देशवासीयांची माफी मागितली आहे. आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये अक्षय म्हणतो, ” माझ्याकडून भारतीय तिरंग्याबद्दल आचारसंहितेचा भंग झाला आहे, त्याबद्दल मी देशवासीयांची माफी मागतो. मी छायाचित्र डिलीट केले असून कोणत्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. ”