शेवटी कूकने लारा, चंद्रपॉलचा मोठा कसोटी विक्रम मोडलाच !

मेलबॉर्न । ॲशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूकने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ६वे स्थान पटकावले आहे. त्याने विंडीजच्या ब्रायन लारा आणि शिवनारायण चंद्रपॉलचा विक्रम मोडला आहे.

कूकने १५१ कसोटी सामन्यात ११९५६ धावा केल्या आहेत तर लाराने १३१ कसोटी सामन्यात ११९५३ धावा केल्या होत्या. विंडीजच्याच शिवनारायण चंद्रपॉलने १६४ सामन्यात ११८६७ धावा केल्या आहेत.

कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चंद्रपॉलला मागे टाकण्यासाठी कूकला काल ५६ धावांची गरज होती. आज त्याने जबदस्त खेळी करत नाबाद २४४ धावांची खेळी केली. त्यामुळे तो ८व्या स्थानावरून थेट ६व्या स्थानावर विराजमान झाला.

कूकला जर या यादीत दुसऱ्या स्थानावर जायचे असेल तर त्याला येत्या काळात कमीतकमी १५०० धावा कराव्या लागणार आहे. आणि मास्टर ब्लास्टर सचिनच्या मागे टाकत अव्वल स्थान पटकावयाचे असेल तर निवृत्तीपूर्वी ४००० धावा कराव्या लागतील.