अॅलिस्टर कूकला शेवटच्या कसोटीत संगकाराला मागे टाकत हा मोठा पराक्रम करण्याची संधी

लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात केनिंग्टन ओव्हल मैदानावर सुरु असलेला पाचवा कसोटी सामना हा दिग्गज क्रिकेटपटू अॅलिस्टर कूकचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना आहे. या सामन्यानंतर तो निवृत्ती घेणार आहे.

या सामन्यात इंग्लंडने तिसऱ्या दिवसाखेर 2 बाद 114 धावा केल्या आहेत. तर कूक 46 धावांवर नाबाद खेळत आहे. त्यामुळे त्याला या सामन्यात एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

त्याने जर या सामन्यात अजून 30 धावा केल्या तर तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत पाचव्या क्रमांकावर येईल. तसेच श्रीलंकेचा दिग्गज कर्णधार कुमार संगकाराला मागे टाकेल.

संगकाराने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 12400 कसोटी धावा केल्या आहेत. तर कूकच्या तिसऱ्या दिवसाखेर कसोटी कारकिर्दीत 12371 धावा झाल्या आहेत. या यादीत अव्वल क्रमांकावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. त्याने 15921 धावा केल्या आहेत.

कूक हा इंग्लंडचा सर्वाधिक कसोटी धावा करणारा तसेच सर्वात जास्त कसोटी सामने खेळणारा खेळाडू आहे. तो सध्या भारताविरुद्ध खेळत असलेला हा सामना हा त्याचा कारकिर्दीतील एकूण 161 वा कसोटी सामना आहे, तर सलग 159 वा कसोटी सामना आहे. सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळण्याचाही विक्रम कूकच्या नावावर आहे.

कूकने 1 ते 5 मार्च 2006 दरम्यान नागपूरमध्ये भारताविरुद्ध पार पडलेल्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. या सामन्यात कूकने पहिल्या डावात 60 तर दुसऱ्या डावात नाबाद 104 धावा करत शतक केले होते. त्याने या सामन्यात दोन्ही डावात मिळून 164 धावा केल्या होत्या.

तसेच आता कूक त्याचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामनाही भारताविरुद्ध खेळत आहे. त्यामुळे त्याने आणखी एक खास विक्रम केला आहे.

तो एकाच प्रतिस्पर्धी विरुद्ध कसोटी पदार्पणाच्या सामन्यात आणि शेवटच्या सामन्यात दोन्ही डावात मिळून 100 पेक्षा जास्त धावा करणारा चौथाच क्रिकेटपटू ठरला आहे.

त्याने भारताविरुद्ध सुरु असलेल्या त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 71 धावा केल्या होत्या तर तो दुसऱ्या डावात 46 धावांवर नाबाद खेळत आहे. त्यामुळे त्याने या सामन्यात तिसऱ्या दिवसाखेर 117 धावा केल्या आहेत.

कसोटीत सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू-

15921 धावा – सचिन तेंडुलकर

13378 धावा – रिकी पॉटिंग

13289 धावा – जॅक कॅलिस

13288 धावा – राहुल द्रविड

12400 धावा – कुमार संगकारा

12371 धावा – अॅलिस्टर कूक*

एकाच प्रतिस्पर्धी विरुद्ध कसोटी पदार्पणाच्या आणि शेवटच्या सामन्यात दोन्ही डावात मिळून 100 पेक्षा जास्त धावा करणारे क्रिकेटपटू-

– रेगी डफ: पदार्पण – 32 आणि 104 धावा; शेवटचा सामना 146 धावा (इंग्लंड विरुद्ध)

– बिल पॉन्सफोर्ड: पदार्पण – 110 आणि 27 धावा; शेवटचा सामना 246 आणि 22 धावा (इंग्लंड विरुद्ध)

– ब्रुस मिशेल: पदार्पण – 88 आणि 61* धावा; शेवटचा सामना 99 आणि 56 धावा (इंग्लंड विरुद्ध)

– अॅलिस्टर कूक: पदार्पण – 60 आणि 104* धावा; शेवटचा सामना 71 आणि 46* धावा (भारत विरुद्ध)

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

पाचवी कसोटी: तिसरा दिवस फलंदाजांनी गाजवला; भारताकडून जडेजा, विहारीचे अर्धशतक

पदार्पणातच अर्धशतक करणारा हनुमा विहारी द्रविड, गांगुलीच्या यादीत सामील

दिग्गज क्रिकेटपटू अॅलिस्टर कूकने शेवटच्या सामन्यासाठी केला भुयारी रेल्वेने प्रवास