अॅलिस्टर कूकने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा

इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू अॅलिस्टर कूकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. तो सध्या सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत संघातील कसोटी मालिकेनंतर निवृत्त होणार आहे.

म्हणजेच 7 सप्टेंबरपासून सुरु होणारा इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील पाचवा कसोटी सामना हा कूकचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे.

त्याच्या या निवृत्तीच्या निर्णयाबद्दल कूक म्हणाला, “मागील काही महिन्यांनंतर खूप विचार केल्यावर भारताविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर मी निवृत्ती जाहिर करण्याचा निर्णय घेतला आहे. “

“हा जरी वाईट दिवस असला तरी माझ्या चेहऱ्यावर हास्य आहे कारण मला माहित आहे की मी माझ्याकडे असणारे सर्व काही दिले आहे आणि आता माझ्याकडे काहिही उरलेले नाही.”

“हा इंग्लिश खेळ खेळताना कल्पनेपेक्षाही मी खूप काही मिळवले आहे आणि मला आभिमान आहे की मी अनेक महान खेळाडूंबरोबर बराच काळ खेळलो. पुन्हा एकदा संघसहकाऱ्यांबरोबर ड्रेसिंग रुम शेअर न करण्याचा विचार हा माझ्या निर्णयाचा सर्वात कठीण भाग आहे. पण मला माहित आहे की हीच योग्य वेळ आहे.”

“माझे माझ्या आयुष्यात क्रिकेटवर प्रेम आहे. मग ते गार्डनमध्ये एखाद्या लहान मुलाप्रमाणे क्रिकेट खेळणे असो किंवा ते देशासाठी क्रिकेट खेळणे असो. त्यामुळे पुढच्या पिढीकडे जबाबदारी देण्याची ही योग्य वेळ आहे, हे मला माहित आहे. आता मनोरंजन करण्याची आणि देशासाठी खेळताना आभिमाना बाळगण्याची त्यांची वेळ आहे.”

याबरोबरच कूकने त्याचे आदर्श, प्रशिक्षक आणि मार्गदर्शक असणारे इंग्लंडचे महान क्रिकेटपटू ग्रॅहम गुच यांचेही आभार मानले आहेत. याबरोबरच त्याने त्याच्या कुटुंबाने दिलेल्या पाठिंब्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त केली आहे.

कूकने 1-5 मार्च 2006 दरम्यान नागपूर येथे झालेल्या भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

कूक हा कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे. तसेच तो इंग्लंडचा कसोटीत सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज आहे.

त्याने 160 कसोटी सामन्यात 44.88 च्या सरासरीने 12,254 धावा केल्या आहेत. यात त्याने 32 शतके आणि 56 अर्धशतके केली आहेत. तसेच तो 158 सलग कसोटी सामने ही खेळला आहे. त्यामुळे सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे.

त्याच्यासाठी 2010-11 मध्ये झालेली अॅशेस मालिका आणि 2012-13मध्ये केलेला भारत दौरा खास ठरला होता. या दोन्ही कसोटी मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याचबरोबर मागील वर्षी त्याने विंडिज आणि आॅस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीत दोन द्विशतकेही केली होती.

मात्र तरीही 2016 ला कर्णधारपद सोडल्यापासून त्याची सरासरी 35 पेक्षा कमी झाली आहे. तसेच या वर्षी त्याला एकदाच 50 पेक्षा जास्त धावा करता आल्या आहेत. त्यामुळे त्याने निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी तो निवृत्ती घेणार असला तरी तो काउंटी क्रिकेटमध्ये एसेक्स संघाकडून 2019 च्या मोसमात पुढे खेळणार आहे, असेही त्याने सांगितले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या:

कोहली बाद तर झाला.. परंतु खास विक्रमांपासुन कुणी रोखु शकले नाही

राशिद खान खेळणार या मोठ्या क्रिकेट लीगमध्ये