आयपीएल गाजवलेल्या दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटूचा सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा…

दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एल्बी मॉर्केलने आज(9 जानेवारी) सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली आहे. त्याने ही माहिती ट्विट करत दिली आहे.

त्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘हा माझ्यासाठी शेवट आहे. हा खूप चांगला प्रवास होता. अनेक चांगल्या वाईट आठवणी होत्या, पण मी सुदैवी आहे की माझी इतक्या वर्षांची कारकिर्द होती. दक्षिण आफ्रिकेचे आणि टायटन्स संघाचे आभार.’

एल्बीने 1999-00 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने दक्षिण आफ्रिकेकडून 1 कसोटी, 58 वनडे आणि 50 टी20 सामने खेळले आहेत. त्याने यात वनडेमध्ये 23.69 च्या सरासरीने 782 धावा आणि 50 विकेट्स घेतल्या आहेत. तर टी20 मध्ये 21.18 च्या सरासरीने 572 धावा केल्या आहेत.

त्याच्या या निवृत्तीबद्दल तो म्हणाला, ‘मी माझी निवृत्तीची घोषणा करत आहे. माझ्या आयुष्यातील मागील 20 वर्षांचा प्रवास अनेक चांगल्या आठवणींसह खूप आनंददायी होता. या आठवणी कायम लक्षात राहितील.’

तो पुढे म्हणाला, ‘मला क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे आभार मानायचे आहेत. कारण त्यांनी मला माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मोठा मान दिला. तसेच मी माझ्या कुटुंबियांचे, मित्रांचे मला पाठिंबा देणाऱ्यांचे आणि प्रायोजकांचे आभार मानतो. ते माझ्या प्रत्येक चढ-उतारामध्ये बरोबर होते. विशेषत: माझी पत्नी, तिने मला जे आवडते ते करण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला.’

‘क्रिकेटने मला आयुष्य चांगले जगण्यासाठी पूर्ण तयार केले आहे. माझ्या समोर आता अनेक संधी येतील त्याच्याकडे मी आता लक्ष देईल. तसेच मी खेळाची बाहेर राहुन मजा घेईल.’

एल्बीने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली डेअरडेविल्स आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने आयपीएलमध्ये 91 सामने खेळताना 24.35 च्या सरासरीने 974 धावा केल्या असून 85 विकेट्सही घेतल्या आहेत.

भाऊ मॉर्ने मॉर्केलपेक्षा दोन वर्षांनी मोठा असलेला एल्बी 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळाला आहे. हा टी20 सामनाही त्याने भारताविरुद्ध खेळला आहे. त्यानंतर तो अनेक लीगमध्ये खेळला आहे.

त्याने नुकतेच दक्षिण आफ्रिकेत झालेल्या एमझांसी सुपर लीगमध्ये डर्बन हिट संघाचे कर्णधारपद सांभाळले होते. त्याने त्याच्या शेवटच्या सामन्यातही त्शवान स्पार्टन्स संघाविरुद्ध नाबाद 57 धावांची खेळी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

हरेंद्र सिंग यांची पुरूष हॉकी संघाच्या पदावरून गच्छंती

भविष्यात टीम ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीची धुरा सांभाळू शकतो बुमराह, पहा व्हीडिओ

मुंबईकर शार्दुल ठाकूर या कारणामुळे आहे निराश