आंतरशालेय हॉकी स्पर्धेत आलेगावकर हायस्कूलची गेनबा मोझे संघावर मात

पुणे: आलेगांवकर हायस्कूलने जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण विभाग (पुणे महानगरपालिका) आयोजित  जिल्हास्तरीय आंतरशालेय हॉकी स्पर्धेच्या १४ वर्षांखालील मुलांच्या गटातील लढतीत गेनबा मोझे संघावर मात केली.

ही स्पर्धा म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील हॉकी मैदानावर सुरू आहे. आलेगांवकर हायस्कूलने टायब्रेकमध्ये गेनबा मोझे हायस्कूलवर २-० ने मात केली. निर्धारित वेळेत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे टायब्रेकचा अवलंब करण्यात आला. यात गेनबा मोझे हायस्कूलच्या एकाही खेळाडूला गोल करता आला नाही, तर आलेगांवकर हायस्कूलकडून रोहित गायकवाड आणि आदित्य थोरात यांनी गोल केले.

या स्पर्धेतील १४ वर्षांखालील मुलांच्या गटात खडकीच्या सेंट जोसेफ स्कूलने एन्जल स्कूलवर ४-० ने मात केली. ही लढत एकतर्फीच झाली. यात शिवम पाटीलने (४, ७ मिनिट) दोन गोल केले, तर अंगीर मंथन (२ मि.), कर्णधार रोहन राठोडने (६ मि.) प्रत्येकी एक गोल केला. एन्जलकडून एकालाही सेंट जोसेफ स्कूलचा बचाव भेदता आला नाही.

मॉडर्न हायस्कूलने एस. व्ही. एस. हायस्कूलवर १-०ने मात केली. लढतीच्या सातव्या मिनिटाला अनिकेत आग्रेने गोल करून मॉडर्न हायस्कूल संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखून मॉडर्न हायस्कूलने विजय मिळवला. सेंट पॅट्रिक्स संघाने विद्याभवन संघाचा १-० ने पराभव केला. यात, लढतीच्या दुस-या मिनिटाला रोहन इंदलकरने केलेला गोल निर्णायक ठरला.

विद्याभवन संघाने बरोबरी साधण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. पण त्यात त्यांना यश आले नाही. यानंतर झालेल्या लढतीत मॉडर्न हायस्कूलने टायब्रेकमध्ये कर्नल भगत इंग्लिश मीडियम स्कूलवर ३-२ ने मात केली. निर्धारित वेळेत ही लढत १-१ अशी बरोबरीत सुटली होती. त्यामुळे टायब्रेकचा अवलंब करण्यात आला. यात कर्नल भगत स्कूलकडून अस्पाक शेख आणि सिमनन सय्यद यांनाच गोल करता आले. मॉडर्न हायस्कूलकडून अनिकेत आग्रे, शुभम राघव, साहिल भोसले यांनी गोल केले आणि विजयात मोलाचा वाटा उचलला.