एटीपी फायनल्स: मारिन चिलीच विरुद्ध अलेक्झांडर झवेरेव विजयी

काल पासून सुरु झालेल्या एटीपी फायनल्स स्पर्धेत जर्मनीच्या अलेक्झांडर झवेरेवने क्रोएशियाच्या मारिन चिलीचचा पहिल्या सामन्यात पराभव केला.

या लढतीत तिसऱ्या मानांकित झवेरेवने पाचव्या मानांकित चिलीचला ६-४,३-६,६-४ अश्या फरकाने तीन सेटमध्ये पराभूत केले.

पहिला सेट झवेरेवने जिंकला होता. परंतु दुसऱ्या सेटमध्ये मात्र चिलीचने पुनरागमन करत हा सेट जिंकला आणि सामना बरोबरीचा केला. झवेरेवने तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये पुन्हा आपला खेळ उंचावत हा सेट जिंकून सामनाही आपल्या नावावर केला.

झवेरेव पहिल्यांदाच एटीपी फायनल्समध्ये खेळत आहे या बद्दल बोलताना तो म्हणाला “इथे पहिल्यांदा आल्यावर मला थोडं नर्व्हस वाटत होत. मला वाटत इथे पहिल्यांदा येणाऱ्यासाठी हे साहजिक आहे. मी माझ्या पहिल्या विजयाबद्दल आनंदी आहे.”

याआधी झवेरेव आणि चिलीच ५ वेळा आमनेसामने आले आहेत यातील ४ लढतीत झवेरेवने विजय मिळवला आहे.

झवेरेवचा पुढील सामना रॉजर फेडररशी होणार आहे. या बद्दल बोलताना तो म्हणाला “या गटात जो फेडररला हरवेल त्याला पुढे जाण्याची चांगली संधी असणार आहे. पण नक्कीच तो खेळणार असलेल्या प्रत्येक सामन्यात फेवरीट असणार आहे. या वर्षी होपमन कपधरून मी त्याच्याबरोबर तीन वेळा खेळलो आहे आणि हे सगळे सामने चांगले झाले होते. अशा आहे की आमचा पुढील सामनाही चांगला होईल.”