ऑल इंडिया निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धा : आझम स्पोर्ट्स अकादमी – हरयाणा यांच्या विजेतेपदासाठी लढत

पुणे : उपांत्य फेरीत आझम स्पोर्ट्स अकादमी व हरयाणा संघांनी अनुक्रमे वूमन्स स्पोर्ट्स असोसिएशन (डब्ल्यूएसए) व वेरॉक क्रिकेट अकादमी संघांना पराभूत करताना ‘आझम स्पोर्ट्स अकादमी’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पाचव्या आबेदा इनामदार ऑल इंडिया निमंत्रित महिला क्रिकेट स्पर्धे’च्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

आझम स्पोर्ट्स अकादमीच्या मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या उपांत्य लढतीमध्ये हरयाणा संघाने वेरॉक क्रिकेट अकादमी संघाला ४ गडी राखून पराभूत केले. प्रथम फलंदाजी करताना वेरॉक क्रिकेट अकादमी संघाने निर्धारित २० षटकांत ३ बाद १२७ धावा केल्या. वेरॉक संघाकडून कश्मीरा शिंदेने ५५ चेंडूत नाबाद ५६ (५ चौकार) धावांची खेळी केली.  तिला श्रद्धा पोखरकरने ३३ चेंडूत ३४  (३ चौकार), साक्षी वाघमोडेने १७ चेंडूत २१ (२ चौकार) धावांची खेळी केली.  हरयाणा संघाकडून नेहा कौशिक व रजनी दहिया यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. तन्नू जोशीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर हरयाणा संघाने १८.३ षटकांत ६ बाद १३० धावा करताना विजय साकारला. तन्नू जोशीने ५१ चेंडूत ८ चौकारांच्या सहाय्याने ५९ धावांची खेळी केली. तिला भारती कश्यपने २० (२० चेंडू, २ चौकार) तर परमिला कुमारीने ११ धावा करताना सुरेख साथ दिली. खुशी मुल्लाने ३ तर साक्षी वाघमोडे व स्वांजली मुळेने प्रत्येकी १ गडी बाद केला. हरयाणाच्या तन्नू जोशीला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.    

दुसऱ्या उपांत्य लढतीमध्ये आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने वूमन्स स्पोर्ट्स असोसिएशन (डब्ल्यूएसए) संघाला ८ गडी राखून पराभूत केले. डब्ल्यूएसए संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १३५ धावा केल्या. यात निकिता आगेने धडाकेबाज फलंदाजी करताना ४१ चेंडूत ९ चौकारांसह ५३ धावांची खेळी केली. तिला नीलम पाटीलने २७ चेंडूत ३९ धावा (७ चौकार) करताना सुरेख साथ दिली. साक्षी कानडीने १५ धावा केल्या. सोनल पाटीलने ३ तर गौतमी नाईक व सोनल देवकाते यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. आझम स्पोर्ट्स अकादमी संघाने १७.३ षटकांत २ बाद १३७ धावा करताना विजय मिळविला. गौतमी नाईकने ४३ चेंडूत ९ चौकार व १ षटकाराच्या सहाय्याने नाबाद ६८ धावांची खेळी केली. तिला सोनल पाटीलने ४० चेंडूत ४ चौकारांच्या सहाय्याने ४३ धावा करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ईशा पठारे व रिया सोनावणे यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. सोनल पाटीलला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

संक्षिप्त धावफलक : वेरॉक क्रिकेट अकादमी : २० षटकांत ३ बाद १२७ (कश्मीरा शिंदे ५६ (५५ चेंडू, ५ चौकार), श्रद्धा पोखरकर ३४ (३३ चेंडू,३ चौकार), साक्षी वाघमोडे २१ (१७ चेंडू, २ चौकार), नेहा कौशिक ४-०-२५-१, रजनी दहिया ४-०-२१-१) पराभूत विरुद्ध हरयाणा १८.३ षटकांत ६ बाद १३० : (तन्नू जोशी ५९ (५१ चेंडू, ८ चौकार), भारती कश्यप २० (२० चौकार, २ चौकार), खुशी मुल्ला ३.३-०-१४-३, साक्षी वाघमोडे ३-०-२२-१, स्वांजली मुळे ४-०-२७-१)

डब्ल्यूएसए : २० षटकांत ५ बाद १३५ (निकिता आगे ५३ (४१ चेंडू, ९ चौकार), नीलम पाटील ३९ (२७ चेंडू, ७ चौकार), साक्षी कानडी १५, सोनल पाटील ४-०-१८-३, गौतमी नाईक ४-०-१५-१, सोनल देवकाते १-०-४-१) पराभूत विरुद्ध आझम स्पोर्ट्स अकादमी : १७.३ षटकांत २ बाद १३७ (गौतमी नाईक ६८ (४३ चेंडू, ९ चौकार, १ षटकार), सोनल पाटील ४३ (४० चेंडू, ४ चौकार), रिया सोनावणे ३-०-२६-१, ईशा पठारे ३.३-०-३२-१)